PMPML : माणुसकीचा धागा! ICU मधील बालकासाठी PMPML कर्मचाऱ्यांनी धावपळ करून पोहोचवले जीवनावश्यक इंजेक्शन
२५ हजारांहून अधिक किमतीचे इंजेक्शन बसमध्ये विसरले; आगार व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मध्यरात्री रुग्णालयाला मिळाले इंजेक्शन
1 मिनिट वाचन

PMPML पुणे, महाराष्ट्र मिरर : कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा प्रत्यय देणारी घटना PMPML च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घडवून आणली आहे. बसमध्ये विसरलेले २५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे जीवनावश्यक इंजेक्शन शोधून त्यांनी ते मध्यरात्री एका दहा वर्षांच्या बालकासाठी रुग्णालयात पोहोचवले. या बालकावर औंध येथील मेडिपॉइंट हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते.
२५ नोव्हेंबर रोजी अमित गायकवाड हे वेस्टएंड ते सांगवी असा प्रवास करत असताना मार्ग क्रमांक २०५/४ वरील बसमध्ये मुलाच्या उपचारासाठी आणलेले इंजेक्शन विसरले. हे इंजेक्शन आईस पॅकमध्ये ठेवले होते. त्यामुळे ते ठरावीक वेळेत रुग्णापर्यंत पोहोचणे आवश्यक होते.
रात्री ११:१० च्या सुमारास रुग्णालयाचे कर्मचारी दीपक कुमार सिंग यांनी चरोली आगाराचे व्यवस्थापक अल्ताफ सय्यद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने शेवाळवाडी आगार व्यवस्थापक मते यांना माहिती दिली. त्यानंतर गॅरेज सुपरवायझर आणि संबंधित बसच्या वाहकाच्या मदतीने इंजेक्शन शोधण्यात आले.
दोन्ही आगारांच्या समन्वयातून रात्री ११:५० वाजता शेवाळवाडीहून निगडीकडे जाणाऱ्या बसने इंजेक्शन खडकी पोस्ट येथे पाठवण्यात आले. तेथे रुग्णालयाचे कर्मचारी दीपक कुमार सिंग यांच्याकडे ते सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले. PMPML कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे बालकाच्या उपचारासाठी महत्त्वाचे इंजेक्शन वेळेत उपलब्ध झाले.

महाराष्ट्र मिरर




