मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
रोहित पवारांना अजितदादांची जागा घेण्याची घाई; हसन मुश्रीफ यांचा टोला, सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचे केले समर्थनतीन आमदारांच्या हत्येच्या कटाचा आरोप; संजय राऊतांच्या दाव्यावर शिंदे गटाचे प्रत्युत्तरपश्चिम बंगालचे नाव बदलण्याच्या हालचाली; ‘पश्चिम बंगा’ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडणारयुट्यूबर ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट; दिल्लीतील साकेत न्यायालयाचा आदेश

सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; १३ सदस्यीय समिती स्थापन

आर्थिक अडचणींचा होणार सखोल अभ्यास; दोन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश, आधुनिक तंत्रज्ञानासह इथेनॉल, सीबीजी निर्मितीला प्रोत्साहन

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

साखऱ कारखाना
साखऱ कारखाना

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील ही समिती राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी आणि कारखाने बंद पडण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करणार आहे. समितीला दोन महिन्यांच्या आत आपला सविस्तर अहवाल आणि शिफारशी शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या समितीमध्ये सहकार आयुक्त, राज्य सहकारी बँक, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँकेच्या संयुक्त अभ्यासातून कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यता तपासली जाणार आहे. प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक स्थिती, कर्जाचा बोजा, उत्पादन क्षमता आणि भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला जाणार आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या एनपीए कारखान्यांसाठी रिझर्व्ह बँकेच्या मदतीने कर्जनिराकरण आणि पुनरुज्जीवन धोरण निश्चित करण्याचाही विचार आहे.

साखर उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढवण्यावर समितीचा भर राहणार आहे. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जीपीएस, ड्रोन आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्याबाबत शिफारशी केल्या जाणार आहेत. याशिवाय सुधारित ऊस बियाणे, मृदा आरोग्य, पीक फेरपालट आणि ऊस विकास कार्यक्रमांचाही अभ्यास होणार आहे. साखर कारखान्यांचे केवळ साखर उत्पादनावर अवलंबित्व न ठेवता त्यांना ऊर्जा संकुल म्हणून विकसित करण्यासाठीही आराखडा तयार केला जाणार आहे.

साखर उद्योगातून अतिरिक्त उत्पन्नाचे पर्याय निर्माण करण्यासाठी सीबीजी, इथेनॉल, मल्टी-फीड डिस्टिलरी आणि शाश्वत विमान इंधन निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव आहे. सहवीज निर्मिती, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जैव-रसायन निर्मितीवरही भर दिला जाणार आहे. कारखान्यांमधील उपपदार्थांचा अधिकाधिक वापर करून सुमारे १० उपपदार्थांची निर्मिती करणारे एकात्मिक बायो-रिफायनरी अर्थात झिरो वेस्ट मॉडेल विकसित करण्याची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.

या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचा २० टक्के, राज्य सरकारचा १० टक्के आणि संबंधित साखर कारखान्यांचा ७० टक्के आर्थिक सहभाग असलेल्या प्रस्तावित प्रारूपाचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच बाह्य गुंतवणूकदारांचा सहभाग, स्वतंत्र पुनरुज्जीवन निधी आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत (एनसीडीसी) भांडवली सहाय्य मिळवण्याबाबत धोरण निश्चित करण्याचाही विचार आहे. हंगामनिहाय स्वतंत्र कॅश क्रेडिट खाते आणि कर्ज परतफेडीचे धोरण ठरवण्याबाबतही समिती शिफारशी करणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक संकटात असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळण्याची आणि साखर उद्योगाला नव्या आर्थिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर