Nitesh Karale : नागपूर पदवीधर निवडणुकीत मोठा उलटफेर घडवल्यानंतर नितेश कराळे मास्तरांचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा इशारा!
•" आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या नाकात दम आणणार; कराळे मास्तरची नवी घोषणा."नागपूर पदवीधर निवडणुकीत 25 हजार मते घेत कराळे ठरले 'किंगमेकर'
1 मिनिट वाचन

•"आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या नाकात दम आणणार; कराळे मास्तरची नवी घोषणा."नागपूर पदवीधर निवडणुकीत 25 हजार मते घेत कराळे ठरले 'किंगमेकर'
नागपूर :- विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते, आणि यामध्ये सर्वात मोठी चर्चा रंगली ती नितेश कराळे (कराळे मास्तर) यांच्या भूमिकेची. कुठल्याही बड्या राजकीय पक्षाचे पाठबळ पाठीशी नसतानाही, कराळे मास्तरांनी या निवडणुकीत तब्बल 25 हजार मते मिळवत जोरदार ताकद दाखवून दिली. त्यांच्या या कामगिरीमुळे भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागला आणि काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय सुकर होण्यात कराळे यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचा मोठा वाटा राहिला. या निवडणुकीने राजकीय समिकरने पूर्णपणे बदलून टाकली आहेत.
निवडणुकीच्या या अभूतपूर्व यशानंतर बोलताना नितेश कराळे यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल मोठे संकेत दिले आहेत. भविष्यात लवकरच एका नवीन पक्षाची स्थापना करण्याबाबत आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करून कोणत्याही राजकीय पक्षाच्या नाकात दम आणू शकतो, असा इशाराही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना व विरोधकांना दिला.
बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी; आता कराळे मास्तरची दखल घ्यावीच लागेल
निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करताना नितेश कराळे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) घेण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली. महाराष्ट्रात जर बॅलेट पेपरवर मतदान झाले, तर नेमकी कोणाची सत्ता येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे ते म्हणाले.
तसेच, आतापर्यंत अनेकांनी आपली दखल घेतली नसेल, परंतु आता राजकारणात 'कराळे मास्तर' कोण आहेत याची दखल घ्यावीच लागेल, असे सांगत त्यांनी भविष्यात एका नव्या राजकीय शक्तीचा उदय करण्याचे संकेत दिले आहेत. या घोषणेमुळे विदर्भासह राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.




