मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

दहा तासांत लावला तरुणाच्या खुनाचा छडा; चार जणांना अटक

वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून कात्रज येथे घडली घटना

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

दहा तासांत लावला तरुणाच्या खुनाचा छडा; चार जणांना अटक

वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून कात्रज येथे घडली घटना

पुणे: लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरात घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या चार आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पाठलाग करून, भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या १० तासांच्या आत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून मुसक्या आवळल्या आहेत.

तेजस दत्तात्रय पिलाणे (वय २४, रा. मोहननगर, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी विशाल दत्तात्रय खोपडे (वय २२), अभिषेक दिलीप खोपडे (वय २३), सचिन हरिचंद्र धुळे (वय ४३) आणि आदिनाथ शिवाजी कसबे (वय १९, सर्व रा. आंबेगाव खुर्द व कात्रज) या चार आरोपींना अटक केली आहे.

सीसीटीव्ही नसतानाही तांत्रिक तपासाने छडा
शनिवारी (ता. २५) पहाटे दीडच्या सुमारास शिवसृष्टी गदा चौकाकडून कात्रजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर तेजस पिलाणे हा तरुण गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. त्याला तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने मयताच्या पार्श्वभूमीचा तपास केला असता, वेल्हा तालुक्यातील एका लग्नातील भांडणाची माहिती समोर आली.

वरातीतील वादाचा असा घेतला सूड
पोलीस तपासात निष्पन्न झाले की, १४ मार्च २०२६ रोजी वेल्हा तालुक्यातील कोंढावळे येथे तेजसच्या मावस भावाच्या लग्नाची वरात सुरू होती. या वरातीत नाचण्यावरून तेजसचे आरोपी विशाल खोपडे याच्याशी कडाक्याचे भांडण झाले होते. याच वादाचा राग मनात धरून विशालने आपल्या साथीदारांच्या मदतीने तेजसचा काटा काढण्याचे ठरवले. शनिवारी रात्री गाठ पडताच या टोळक्याने तेजसवर वार करून त्याची हत्या केली.

इन्स्टाग्राम आणि मोबाईल लोकेशनने लावला माग
आरोपींचे मोबाईल फोन आणि त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’ अकाउंटचे तांत्रिक विश्लेषण केले असता, ते सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात असल्याचे समजले. भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने तातडीने शिरवळ गाठून सापळा रचला आणि चारही आरोपींना ताब्यात घेतले.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार महेश बारवकर, सचिन सरपाले, मंगेश पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Murder of young man solved in ten hours; four arrested

शेअर करा