Mumbai Police News : तुमच्या आधारकार्डवर गुन्हेगार तर शिरले नाहीत ना? मुंबई पोलिसांचा सायबर गुन्हेगारांच्या 'सिम' सिंडिकेटवर सर्जिकल स्ट्राईक!
Mumbai Latest Cyber Fraud News : ग्राहकाच्या एका 'केवायसी'वर दोन सिमकार्डचा खेळ; मदनपुरा ते दहिसरपर्यंत 5 विक्रेत्यांच्या हातात पडल्या बेड्या, सायबर सेलची मोठी कारवाई
2 मिनिट वाचन

Mumbai Latest Cyber Fraud News : ग्राहकाच्या एका 'केवायसी'वर दोन सिमकार्डचा खेळ; मदनपुरा ते दहिसरपर्यंत 5 विक्रेत्यांच्या हातात पडल्या बेड्या, सायबर सेलची मोठी कारवाई
मुंबई :- तुम्ही तुमच्या विश्वासाने सिमकार्ड विक्रेत्याला दिलेले आधारकार्ड कदाचित तुमच्याच अंगाशी येऊ शकते! ज्या आधारकार्डवर तुम्ही स्वतःसाठी एक सिमकार्ड खरेदी केले, त्याच कागदपत्रांचा वापर करून तुमच्या नकळत सायबर गुन्हेगार दुसरा क्रमांक चालवत असल्याची धक्कादायक बाब मुंबई सायबर सेलने उघडकीस आणली आहे. या 'सिमकार्ड जिहाद'सारख्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी शहरातील 5 मोठ्या सिमकार्ड विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले असून, या कारवाईमुळे टेलिकॉम मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. Mumbai Latest Cyber Cell News
मुंबई सायबर गुन्हे शाखेने अलीकडच्या काळात झालेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे तपासले असता, पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले. सायबर गुन्हेगार ज्या मोबाईल क्रमांकावरून लोकांना लुबाडत होते, त्या क्रमांकांची 'कुंडली' काढल्यावर समजले की, हे सर्व सिमकार्ड बनावट पत्त्यांवर आणि दुसऱ्यांच्या आधारकार्डवर ॲक्टिव्ह करण्यात आले होते. या तपास चक्राची सुई थेट सिमकार्ड विक्री करणाऱ्या एजंट्सकडे वळली आणि पोलिसांनी मदनपुरा, कुलाबा, अंधेरी, दहिसर आणि ट्रॉम्बे या पाच विभागांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. Mumbai Latest Cyber Crime News
या विक्रेत्यांची मोडस ऑपेरंडी एखाद्या थरारपटातील कथेसारखीच अंगावर शहारे आणणारी आहे. एखादा सामान्य नागरिक जेव्हा सिमकार्ड घेण्यासाठी या विक्रेत्यांकडे जात असे, तेव्हा हे विक्रेते त्याचे आधारकार्ड आणि फोटो घेवून गुपचूप दोन किंवा त्यापेक्षा जास्त सिमकार्डचे अर्ज (CAF) तयार करत. त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला दिले जाई, तर दुसरे सिमकार्ड हे विक्रेते स्वतःकडे ठेवत. हे 'अतिरिक्त' सिमकार्ड मग वाढीव किमतीत सायबर भामट्यांना, ब्लॅकमेलर्सना आणि ऑनलाईन ठगांना विकले जात असे. इतकेच नाही, तर या सिमकार्डवर नोंदवलेले पत्तेही पूर्णपणे बनावट असायचे, जेणेकरून पोलिसांना तपास करताना आरोपीपर्यंत पोहोचता येऊ नये.
मुंबई पोलीस आयुक्त आणि सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या पाचही एजंट्सना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये मदनपुऱ्यातील मोहम्मद सुलतान अन्सारी, कुलाब्यातील दयाशंकर शुक्ला, अंधेरीतील श्रृष्टी बरनवाल, दहिसरचा नीरज पटवा आणि ट्रॉम्बेचा गौस मोहीउद्दीन यांचा समावेश आहे. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना 'अलर्ट' राहण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या आधारकार्डचा गैरवापर टाळण्यासाठी तात्काळ 'संचार साथी' (Sanchar Saathi) या पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावर नेमके किती सिमकार्ड सुरू आहेत, याची खातरजमा करा. जर तुमच्या माहितीशिवाय एखादा क्रमांक सुरू असल्याचे आढळले, तर वेळ न घालवता 'Not my number' वर रिपोर्ट करा, अन्यथा तुमच्या आधारवर झालेल्या गुन्ह्यासाठी पोलीस तुमच्या दारात उभे राहू शकतात!




