पटवर्धन बाग टँकर पॉईंटवरील मीटर बंद
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मीटर सक्तीचे करण्यात आले होते.
1 मिनिट वाचन

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मीटर सक्तीचे करण्यात आले होते. मात्र मीटरच बंद असल्याने अनियमिततेची शक्यता वर्तवली जात आहे
निलेश राऊत
पुणे: महापालिकेच्या मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एरंडवणे येथील पटवर्धन बाग टँकर फिलिंग पॉईंटवरील पाणी मोजणीचा मीटर गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे उघड झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या नोंदी व पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

क्रिएटिव फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर हा मुद्दा उपस्थित केला. मीटरच बंद असल्यास दररोज किती टँकर भरले जातात आणि एकूण किती लिटर पाणी वितरित होते, याची नोंद महापालिका कशा पद्धतीने ठेवते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेकडून खडकवासला व भामा आसखेड धरणांतून पाणी उचलून शहराला पुरवठा केला जातो. ज्या भागांत नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी दिले जाते. यासाठी पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतुःश्रृंगी, पद्मावती आणि पटवर्धन बाग अशा सात ठिकाणी टँकर पॉईंट उभारण्यात आले आहेत. महापालिका व कंत्राटदारांच्या टँकरद्वारे मागणीनुसार पाणीपुरवठा केला जातो. या योजनेवर दरवर्षी सुमारे ६० कोटी रुपये खर्च होतो.
खर्डेकर यांनी आरोप केला की, संबंधित टँकर पॉईंटवरील मीटर १६ डिसेंबर २०२५ पासून बंद आहे. या पॉईंटमधून प्रभाग क्रमांक १०, ११, २९, ३०, ३१, ३२ आणि ३३ या भागांना पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नोंदवहीत १८ टँकरची नोंद असताना प्रत्यक्षात ५० टँकर भरल्याचे आढळले होते. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मीटर सक्तीचे करण्यात आले होते. मात्र मीटरच बंद असल्याने पुन्हा अनियमिततेची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच, टँकर वितरणानंतर संबंधित सोसायटी किंवा वस्त्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या रजिस्टर किंवा चलनावर घेतल्या जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. बंद मीटरच्या काळात झालेल्या पुरवठ्याची आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी करावी.




