Maharashtra Water Supply : राज्यातील धरणे तुडुंब, मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा 93 टक्क्यांवर
Maharashtra Water Supply Latest News : लघु प्रकल्पांत मात्र पाणी कमी, कोकण आणि पुणे विभागात सर्वाधिक पाणीसाठा
1 मिनिट वाचन

Maharashtra Water Supply Latest News : लघु प्रकल्पांत मात्र पाणी कमी, कोकण आणि पुणे विभागात सर्वाधिक पाणीसाठा
मुंबई :- राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण 2997 धरणांमधील पाणीसाठा 85.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषतः, मोठ्या धरणांनी 90 टक्क्यांचा टप्पा पार केला असून, त्यांच्यातील एकूण पाणीसाठा 93.12 टक्क्यांवर गेला आहे. मात्र, या तुलनेत राज्यातील लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येत आहे.
लघु प्रकल्पांत पाणीसाठा कमी का?
राज्यात एकूण 2599 लघु प्रकल्प असून, त्यांचा पाणीसाठा केवळ 57.18 टक्क्यांवर आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिचंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लघु प्रकल्प हे सहसा कमी पावसाच्या किंवा दुष्काळी प्रदेशात असतात. त्यांची पाणी साठवण क्षमताही कमी असते, त्यामुळे अनेकदा ते पूर्ण भरत नाहीत. याच कारणामुळे नाशिक आणि पुणे विभागातील लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा 59 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
विभागांनुसार पाणीसाठ्याची स्थिती
राज्यात विभागानुसार पाणीसाठ्यात मोठी तफावत आहे, पण कोकण आणि पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.
कोकण विभाग: एकूण धरणांमध्ये 92.55 टक्के पाणीसाठा.
पुणे विभाग: 91.49 टक्के पाणीसाठा.
नाशिक विभाग: 79.32 टक्के पाणीसाठा.
छत्रपती संभाजीनगर: 81.10 टक्के पाणीसाठा.
अमरावती विभाग: 84.97 टक्के पाणीसाठा.
नागपूर विभाग: 77.98 टक्के पाणीसाठा.
विशेष म्हणजे, पुणे आणि कोकण विभागातील मोठ्या धरणांत 97 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे, तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील मोठ्या धरणांतही तो 90 टक्क्यांच्या पुढे आहे. फक्त नागपूर विभागातील मोठ्या धरणांत 76.75 टक्के पाणीसाठा आहे.




