Madhur Mhatre : मधुर म्हात्रेंचा 'मशाल' सोडून 'धनुष्यबाण' हाती; ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, कायदेशीर लढाईची चिन्हे
Madhur Mhatre Joined Eknath Shinde Shivsena : कारवाईविना हकालपट्टी केल्याने निष्ठावान शिवसैनिक आक्रमक; कोकण आयुक्तांकडे पद रद्द करण्याची दाद मागणार
1 मिनिट वाचन

Madhur Mhatre Joined Eknath Shinde Shivsena : कारवाईविना हकालपट्टी केल्याने निष्ठावान शिवसैनिक आक्रमक; कोकण आयुक्तांकडे पद रद्द करण्याची दाद मागणार
कल्याण :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 'मशाल' चिन्हावर निवडून आलेले कल्याण पूर्वेतील नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी महासभेच्या पूर्वसंध्येला शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रवेश केला आहे. मात्र, म्हात्रे यांच्यावर पक्षाने कोणतीही कठोर कारवाई किंवा चौकशी न करताच त्यांना जाऊ दिल्याने ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
छायाचित्रे · 1/3
Arrow Keys ⟵ ⟶
निष्ठावंतांचा आरोप: "सहज ताबा दिला"
गेल्या दोन महिन्यांपासून पक्षापासून अलिप्त राहिलेल्या मधुर म्हात्रे यांच्यावर पक्षाने कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक होते, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. म्हात्रे कोणत्याही कायदेशीर कचाट्यात न अडकता 'सहीसलामत' शिंदे गटात सामील झाल्याने, "निवडून एका चिन्हावर यायचे आणि सोयीनुसार दुसऱ्या पक्षात जायचे" अशी चुकीची सवय इतरांनाही लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वरिष्ठ नेते अनभिज्ञ?
मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करताना वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा ठाकरे गटाच्या वरिष्ठ वर्तुळात रंगली आहे. मातोश्रीच्या परिघातील एक युवा आणि एक ज्येष्ठ नेते तसेच कल्याणमधील स्थानिक नेत्यांनी संगनमताने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता थेट हकालपट्टी केल्याने म्हात्रे यांचा मार्ग सुकर झाल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत.
कायदेशीर कारवाईचा पवित्रा
कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर आता ठाकरे गटाने कायदेशीर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
जिल्हाध्यक्षांची भूमिका: "नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्यावर आमचे लक्ष होते. जरी त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला असला, तरी त्यांनी पक्षांतर बंदीचा नियम मोडला आहे," असे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी स्पष्ट केले.
पद रद्द करण्याची मागणी: म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे कायदेशीर दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कल्याणच्या राजकारणात खळबळ
पालिका महासभेच्या बरोबर आधी म्हात्रे यांनी पक्षबदल केल्याने कल्याणच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. ठाकरे गटातील काही जाणत्या शिवसैनिकांनी हा संपूर्ण प्रकार पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचवला असून, स्थानिक पातळीवर कोणाची काय भूमिका होती, याचा तपास होण्याची शक्यता आहे.




