Kashigaon Police News : बिहारमधील खुनाच्या गुन्ह्यातील 4 वर्षांपासून फरार आरोपीला काशिगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या
*बिहारमधील खुनाच्या गुन्ह्यातील 4 वर्षांपासून फरार आरोपीला काशिगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या*
2 मिनिट वाचन

*बिहारमधील खुनाच्या गुन्ह्यातील 4 वर्षांपासून फरार आरोपीला काशिगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या*
*•मिरा रोडमध्ये नाव बदलून राहत होता नराधम; एका ई-मेलने संपवला 4 वर्षांचा लपंडाव*
मिरा रोड :- बिहार राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात मिरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलिसांच्या काशिगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठे यश आले आहे. गेल्या 4 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन मिरा रोड परिसरात ओळख लपवून राहणाऱ्या अमरेंद्रकुमार रामनगीना सिंह याला पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
*नेमकी घटना काय?*
2022 मध्ये बिहारच्या मोताहरी येथील पकडीदयाल पोलीस ठाण्यात खुनाचा (कलम 302) आणि इतर गंभीर कलमान्वये (कलम 324, 325, 147, 148 इ.) गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी अमरेंद्रकुमार सिंह याच्याविरुद्ध मोतीहारी सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. मात्र, तो बिहारमधून फरार होऊन ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड भागात नाव आणि अस्तित्व लपवून वास्तव्यास होता.
*एका ई-मेलने फिरवली तपासाची चक्रे*
दिनांक 22 मार्च 2026 रोजी बिहारमधील रहिवासी निरज सिंग यांनी काशिगाव पोलीस ठाण्याला ई-मेलद्वारे माहिती दिली की, सदर आरोपी मिरा रोडमधील 'महाराजा नर्सरी' परिसरात लपून बसला आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
*पोलिसांची धाडसी कामगिरी*
काशिगाव पोलिसांनी आपल्या गुप्त बातमीदारांचे जाळे विणले आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर मुंबई-अहमदाबाद हायवेवरील हिलटॉप हॉटेल (वर्सावे गाव, मिरा रोड पूर्व) परिसरात आरोपी मिळून आला. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.
*न्यायालयीन कोठडी*
आरोपी अमरेंद्रकुमार सिंह याला 23 मार्च 2026 रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. एका सामान्य नागरिकाने दिलेल्या ई-मेलची तत्परतेने दखल घेऊन 4 वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला जेरबंद केल्याबद्दल काशिगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.
यांनी केली कामगिरी
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय पुजारी, उपनिरीक्षक विजय साठे, अभिजीत लांडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.




