उरुळी कांचनमध्ये महिला पोलीस अंमलदाराचा सासरकडून छळ
पती, सासू-सासरे यांच्यासह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा
1 मिनिट वाचन

पती, सासू-सासरे यांच्यासह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा
पुणे: महिला पोलीस अंमलदारालाच सासरच्या जाचाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला अंमलदाराने पती, सासू-सासरे यांच्यासह सासरच्या सहा जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तक्रारदार प्रियंका शिवकुमार खबाले (वय २५, सध्या रा. शिंदवणे, ता. हवेली, मूळ ता. माढा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती शिवकुमार श्यामराव खबाले, सासू शोभा श्यामराव खबाले, सासरे श्यामराव खबाले, नणंद लक्ष्मी खबाले, तसेच दीर अमर खबाले व मंगेश खबाले (सर्व रा. कळंब, जि. धाराशिव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका आजारी पडल्यावर सासरच्यांचे उपचाराकडे दुर्लक्ष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका यांचा विवाह डिसेंबर २०२१ मध्ये कळंब (जि. धाराशिव) येथील शिवकुमार खबाले याच्याशी झाला. लग्नावेळी वधूपक्षाकडून ५ तोळे सोने, ४ लाख रुपये रोख आणि सुमारे ५ लाखांचे संसारोपयोगी साहित्य देण्यात आले होते.
लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेल्यानंतर प्रियंका आजारी पडल्यावर सासरच्यांनी त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. “तुझ्या आई-वडिलांकडे जाऊन उपचार कर,” असे सांगत त्यांना माहेरी पाठवण्यात आले.
संगणक क्लासला जाण्यास अडथळे
यानंतर प्रियंका यांनी पुढील शिक्षणासाठी संगणक क्लास सुरू केला असता, सासरच्या मंडळींनी त्यांना घरात कोंडून ठेवत क्लासला जाण्यास अडथळे निर्माण केल्याचा आरोप आहे. घरकामाचा अतिरिक्त बोजा टाकून त्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भरतीच्या तयारीलाही विरोध
प्रियंका यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केल्यानंतर १५ मे २०२२ रोजी अकॅडमी जॉईन केली. त्यावेळी पतीने दारूच्या नशेत अकॅडमीत येऊन “भरती झालीस तर तुला नांदवणार नाही” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Female police officer harassed by father-in-law in Uruli Kanchan




