मनी लाँड्रिंग’ची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेला ४३ लाखांना लुटले
सहकारनगरमध्ये 'डिजिटल अरेस्ट’चा प्रकार
1 मिनिट वाचन

सहकारनगरमध्ये 'डिजिटल अरेस्ट’चा प्रकार
पुणे: तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला असून मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात तुमचे नाव आले आहे, अशी भीती दाखवून एका ६८ वर्षीय ज्येष्ठ महिलेची ४३ लाख ७ हजार ७८० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) करण्याच्या धमकीतून सायबर चोरट्यांनी हा डल्ला मारला असून, याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरात राहणाऱ्या एका ६८ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही घटना ८ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली. अज्ञात सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. आपण नाशिक पोलीस दलातून बोलत असल्याचे भासवून चोरट्यांनी “तुमच्या नावाने अनेक पोलीस तक्रारी प्राप्त झाल्या आहेत,” असे सांगून महिलेला घाबरवले.
अधिक विश्वास बसण्यासाठी चोरट्यांनी महिलेचे बोलणे एका कथित 'वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्या’शी करून दिले. “तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग झाले असून तुमची चौकशी करावी लागेल,” असे आरोपींनी सांगितले.
अटकेची भीती दाखवून आणि पोलिसांच्या नावाने मानसिक दबाव निर्माण करून चोरट्यांनी महिलेला एका खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडले. या भूलथापांना बळी पडून फिर्यादी ज्येष्ठ महिलेने आपल्या बँक खात्यातून एकूण ४३ लाख ७ हजार ७८० रुपये आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर वर्ग केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ३१९(२), ३१८(४), २०४ आणि ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस कधीही अशा प्रकारे फोनवरून पैशांची मागणी करत नाहीत, त्यामुळे अशा धमक्यांना घाबरू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
Elderly woman robbed of 43 lakhs by fearing 'money laundering'




