पुणे विद्यापीठ परिसरातील महिलेला सायबर चोरटयांनी ४.२० लाखांना लुटले
ऑनलाईन टास्क आणि शेअर गुंतवणुकीचे आमिष; व्हॉट्सॲप-टेलिग्रामद्वारे संपर्क साधून जाळ्यात ओढले
1 मिनिट वाचन

ऑनलाईन टास्क आणि शेअर गुंतवणुकीचे आमिष; व्हॉट्सॲप-टेलिग्रामद्वारे संपर्क साधून जाळ्यात ओढले
पुणे: ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास आणि शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखवत पुणे विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेची तब्बल ४ लाख २० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे २०२५ ते २६ मे २०२५ या कालावधीत आरोपींनी व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. सुरुवातीला ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास आकर्षक कमिशन मिळेल, असे सांगून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला.
यानंतर शेअर बाजार आणि विविध गुंतवणूक योजनांमधून मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. अधिक नफा मिळण्याच्या आशेने महिलेने वेळोवेळी रक्कम हस्तांतरित केली.
मात्र गुंतवणुकीवरील परतावा किंवा मूळ रक्कम न मिळाल्याने महिलेला संशय आला. चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपींनी एकूण ४ लाख २० हजार रुपये उकळून आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांच्या मदतीने संबंधित बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि डिजिटल व्यवहारांचा मागोवा घेतला जात आहे.




