Crime News : दुचाकीसह मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
1 मिनिट वाचन

५ लाख ३५ हजारांचा ऐवज हस्तगत; बावधन पोलिसांची कामगिरी
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांना अटक केली असून एक विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ५ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी आणि चोवीस मोबाईल फोन असा ऐवज हस्तगत केला असून, एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Crime News
अनिल लहु जाधव (वय २०, रा. म्हाळुंगे, पुणे), वसंत अंकुश जाधव (वय २५), सुनील लहु जाधव (वय २५, दोघे रा. सुतारवाडी, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बावधन आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे हे पथकासह म्हाळुंगे-नांदे रोडवर गस्त घालत होते.Crime News
गस्तीदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या युनिकॉर्न दुचाकीवरून जाणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अनिल जाधव याने गुन्ह्यांची कबुली दिली. आपल्या वरील साथीदारांसह बावधन आणि हिंजवडी परिसरातून दुचाकी व मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. पोलिसा तपासात आरोपींकडून सात गुन्हे उघडकीस आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार, पोलिस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, सहायक पोलिस फौजदार बापूसाहेब धुमाळ, पोलिस हवालदार अरुण नरळे, फारुक मुल्ला, नितीन चंदनशिव, महेश शिंदे, अतिश जाधव, तसेच पोशि. दत्ता शिंदे, बाबासाहेब पोटे, स्वप्निल साबळे, अक्षय लाटे, ऋषीकेश पाटील आणि मंगेश लोखंडे यांच्या पथकाने केली.
तपासात सात गुन्हे उघड
आरोपींवर यापूर्वीच बावधन पोलिस ठाण्यात चार गुन्हे, हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.




