Chakan Crime News : १५० किलो गांजा मिश्रित बंटा गोळी तस्करी प्रकरणातील आरोपीस ३० दिवसात जामीन मंजूर
खेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; जप्ती सहआरोपीकडून झाल्याचा बचाव पक्षाचा दावा ग्राह्य
2 मिनिट वाचन

खेड-राजगुरुनगर, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : chakan crime news : सुमारे १५० किलो गांजा मिश्रित अंमली बंटा गोळ्यांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी दिलीप हुकूमतराय कुंदवाणी यांना खेड-राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी ६ जून रोजी हा आदेश दिला. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत दाखल झालेल्या या प्रकरणात न्यायालयाने तपासातील उपलब्ध पुरावे, आरोपीची भूमिका आणि बचाव पक्षाचे मुद्दे विचारात घेत जामीन मंजूर केला.

दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल निखिल बाळासाहेब वरपे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, ९ मे २०२६ रोजी नाणेकरवाडी (ता. खेड) परिसरात राहुलसिंग लोधी हा इसम मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. राहुलसिंग लोधी याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून तब्बल १४९ किलो ७१५ ग्रॅम वजनाच्या गांजा मिश्रित अंमली बंटा गोळ्या जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ आरोपी दिलीप कुंदवाणी याला विकण्यासाठी ठेवण्यात आला होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच राहुलसिंग लोधी आणि दिलीप कुंदवाणी यांनी परस्पर संगनमत करून अंमली पदार्थांच्या व्यवहारात सहभाग घेतल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात अटक झाल्यानंतर आरोपी दिलीप कुंदवाणी यांनी अॅड. प्रसाद विराज निकम आणि अॅड. मन्सूर तांबोळी यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान बचाव पक्षातर्फे अॅड. प्रसाद विराज निकम यांनी न्यायालयासमोर सविस्तर युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, प्रकरणातील संपूर्ण अंमली पदार्थांचा साठा हा सहआरोपी राहुलसिंग लोधी याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला असून दिलीप कुंदवाणी यांच्या ताब्यातून कोणतीही जप्ती किंवा वसुली झालेली नाही. तसेच आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसून त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.
बचाव पक्षाने पुढे असा युक्तिवाद केला की, तपास जवळपास पूर्ण झाला असून आरोपीकडून आणखी कोणतीही माहिती किंवा पुरावे मिळण्याची शक्यता नाही. अद्याप दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल झालेले नसून खटल्याची सुनावणी व अंतिम निकाल लागण्यास बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे आरोपीला अनिश्चित काळासाठी कारागृहात ठेवणे योग्य ठरणार नाही, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपासातील उपलब्ध कागदपत्रांचा विचार केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी दिलीप हुकूमतराय कुंदवाणी यांचा जामीन अर्ज मंजूर केला. न्यायालयाने आवश्यक अटी व शर्तींसह आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात अॅड. प्रसाद विराज निकम यांना अॅड. शिवानी वाघमारे, अॅड. रोहित ढोते आणि अॅड. पृथ्वीजित माने यांनी सहकार्य केले.
NDPS bail in khed chakan, pune crime news, chakan crime news,




