मोठी बातमी: रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा; खरात प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी सोडले पद
Rupali Chakankar Latest News : "एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागेल हे मला कसे ठाऊक असेल?"; राजीनाम्यानंतर चाकणकरांचे विरोधकांना सडेतोड उत्तर, केवळ 'महिला' म्हणून लक्ष्य केल्याची भावना
2 मिनिट वाचन

Rupali Chakankar Latest News : "एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागेल हे मला कसे ठाऊक असेल?"; राजीनाम्यानंतर चाकणकरांचे विरोधकांना सडेतोड उत्तर, केवळ 'महिला' म्हणून लक्ष्य केल्याची भावना
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या 'कॅप्टन' अशोक खरात सेक्स स्कँडल प्रकरणात आता एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातसोबतचे फोटो आणि पाद्यपूजेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर, प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा यासाठी आपण पद सोडत असल्याचे चाकणकर यांनी जाहीर केले आहे.

"पाद्यपूजेचा व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा"
राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या,"माझे जे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले जात आहेत, ते पाच-सहा वर्षांपूर्वीचे आहेत. आमचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाचे असल्याने आम्ही खरात दाम्पत्याला गुरू मानले होते आणि श्रद्धेपोटी त्यांच्या ट्रस्टशी जोडले गेलो होतो. मात्र, एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागेल किंवा तिचे वैयक्तिक आयुष्य कसे असेल, याची माहिती आम्हाला त्यावेळी कशी असणार?"त्यांनी स्पष्ट केले की, खरातच्या ट्रस्टवरील त्यांच्या संचालकपदाचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजीच संपला आहे.
केवळ 'महिला' म्हणूनच आरोप?
अशोक खरातसोबत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आणि सेलिब्रिटींचे फोटो असताना केवळ मलाच लक्ष्य केले जात असल्याबद्दल चाकणकर यांनी खंत व्यक्त केली. "माझ्यासारख्या अनेक पुरुष नेत्यांचेही फोटो खरातसोबत आहेत, परंतु एक महिला म्हणून केवळ माझ्यावरच चिखलफेक करण्यात आली, याचे वाईट वाटते," असे त्या म्हणाल्या.
सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस देणार
वशीकरण विद्या शिकण्यासाठी चाकणकर यांनी आपल्या हाताचे बोट कापल्याचा दावा काही विरोधकांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, २ सप्टेंबरच्या ज्या फोटोचा आधार घेऊन ही अफवा पसरवली गेली, त्यात माझ्या हाताला कोणतीही जखम नव्हती. ही खोटी माहिती पसरवणाऱ्यांना, विशेषतः सुषमा अंधारे यांना आपण कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
तपासासाठी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्र
रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. "मी खरातच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन करत नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच हवी," अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
लवकरच सर्व पुराव्यानिशी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील 'खोट्या आरोपांचा' भांडाफोड करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.




