ACB Trap : रत्नागिरी पाटबंधारे विभागात 'एसीबी'चा मोठा दणका! 2 लाखांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यासह लिपिक जाळ्यात
ACB Trap Latest News : कपात केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी मागितली होती 3.40 लाखांची लाच; रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई
2 मिनिट वाचन

ACB Trap Latest News : कपात केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी मागितली होती 3.40 लाखांची लाच; रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई
रत्नागिरी :- जिल्ह्यातील पाटबंधारे विभागात भ्रष्टाचाराचा मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकला आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता (वर्ग 1) गणेश हरीदास सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. एका कंत्राटदाराची हक्काची रक्कम मोकळी करण्यासाठी लाचेची मागणी केल्याने ही कारवाई करण्यात आली. Ratnagiri ACB News
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार यांचा 'शिवकृपा कन्स्ट्रक्शन' नावाचा व्यवसाय आहे. त्यांना मंडणगड तालुक्यातील भोळवली येथील लघू पाटबंधारे योजनेच्या धरणाची गळती बंद करण्याचे काम देण्यात आले होते. हे काम तक्रारदारांनी पूर्ण केले आणि त्याची दोन देयके त्यांना मिळाली होती. मात्र, तिसऱ्या आणि अंतिम देयकातून 11 लाख 30 हजार 893 रुपये इतकी रक्कम कपात करण्यात आली होती. ही कपात केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी तक्रारदारांनी पाटबंधारे विभागाकडे अर्ज केला होता. Ratnagiri Latest Bribe News
3.40 लाखांची मागणी अन् 2 लाखांवर तडजोड
तक्रारदार 18 मार्च 2026 रोजी कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांना भेटले. तेव्हा ही अडकलेली रक्कम अदा करण्यासाठी सलगर यांनी तक्रारदारांकडे 3 लाख 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी 27 मार्च 2026 रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली.
एसीबीचा सापळा आणि अटक
तक्रारीची पडताळणी केली असता, कार्यकारी अभियंता सलगर यांनी तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. 27 मार्च रोजीच एसीबीने सापळा रचला. सलगर यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम कनिष्ठ लिपिक शेखर पवार याच्याकडे देण्यास सांगितले. पवाराने ही रक्कम स्वतःच्या आणि सलगर यांच्या फायद्यासाठी स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.
अटकेतील लोकसेवक
1.गणेश हरीदास सलगर (36 वय): कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग (वर्ग 1).
2.शेखर चंद्रमणी पवार (39 वय): कनिष्ठ लिपिक टंकलेखक, रत्नागिरी पाटबंधारे विभाग (वर्ग ३).
तपास पथक आणि मार्गदर्शन
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.




