मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

खेड शिवापूर येथे प्रवाशाची पावणेदोन लाखांची सोन्या-चांदीची सॅक गायब

चहा पिण्यासाठी थांबली ट्रॅव्हल्स बस; सीसीटीव्हीत चोराचे कृत्य कैद

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

खेड शिवापूर येथे प्रवाशाची पावणेदोन लाखांची सोन्या-चांदीची सॅक गायब

चहा पिण्यासाठी थांबली ट्रॅव्हल्स बस; सीसीटीव्हीत चोराचे कृत्य कैद

पुणे: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खेड शिवापूर गावच्या हद्दीत एका प्रवासी ट्रॅव्हल्स बसमधील प्रवाशाची पाळत ठेवून सुमारे १ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असलेली सॅक अज्ञात चोरट्याने अत्यंत शिताफीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरहून कुटुंबासह ठाण्याकडे प्रवास करत असलेले फिर्यादी पहाटेच्या सुमारास चहा पिण्यासाठी बसमधून खाली उतरले असता, चोरट्याने रिकाम्या बसमध्ये प्रवेश करून आसनावरील सॅक पळवली.

ही संपूर्ण चोरीची थरारक घटना हॉटेलच्या आवारात बसवण्यात आलेल्या बंदिस्त कॅमेऱ्यामध्ये (सीसीटीव्हीमध्ये) कैद झाली असून, याप्रकरणी राजगड पोलिसांनी अज्ञात संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. महामार्गालगत असलेल्या हॉटेलच्या परिसरात प्रवाशांचे लक्ष विचलित करून चोऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहाटे पावणेचार ते सव्वाचार वाजण्याच्या सुमारास झाली चोरी
या गंभीर घरफोडी व चोरीच्या घटनेबाबत माधव विष्णू कुरणे (वय ४५ वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. ठाणे पश्चिम, मूळ रा. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. हा चोरीचा प्रकार सोमवार (ता. २५) मे २०२६ रोजी पहाटे पावणेचार ते सव्वाचार वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर गावच्या हद्दीत महामार्गावर असलेल्या ‘प्रसाद मलई चहा’ या हॉटेलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधव कुरणे हे आपल्या कुटुंबासह कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाका येथून ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी 'श्री साई गणेश ट्रॅव्हल्स’च्या खाजगी लक्झरी प्रवासी बसने प्रवास करत होते. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना चहा-पाण्यासाठी आणि विश्रांतीसाठी खेड शिवापूर येथील प्रसाद मलई चहा हॉटेलजवळ थांबली.

दागिने आणि रोकड असलेली सॅक गायब
यावेळी फिर्यादी कुरणे हे कुटुंबासह बसमधून खाली उतरले आणि हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले. चहा पिऊन अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत ते पुन्हा ट्रॅव्हल्स बसमध्ये आपल्या आसनावर येऊन बसले. मात्र, आसनावर (सीटवर) सुरक्षित ठेवलेली सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असलेली त्यांची मुख्य सॅक गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी तात्काळ बसचालक, वाहक आणि आजूबाजूच्या प्रवाशांकडे सॅकबाबत कसून विचारपूस केली, परंतु सॅक कुठेही मिळून आली नाही. अखेर हॉटेलच्या आवारातील बंदिस्त कॅमेऱ्यांचे (सीसीटीव्ही) चित्रीकरण तपासले असता, बसमधील प्रवाशांच्या हालचालींवर पाळत ठेवून असलेल्या एका अज्ञात चोरट्याने अत्यंत शिताफीने रिकाम्या बसमध्ये प्रवेश करून प्रवाशाची सॅक चोरून पलायन केल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

या चोरीनंतर पीडित प्रवाशाने तात्काळ राजगड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. राजगड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बरकाले या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील सखोल तांत्रिक आणि कायदेशीर तपास करत असून, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे संशयित चोरट्याचा माग काढण्यासाठी तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

शेअर करा