शेअर ट्रेडिंगपायी सिंहगड रोडवरील व्यक्तीने गमावले ६२ लाख
अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याच्या ऑनलाईन बहाणा
1 मिनिट वाचन

अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याच्या ऑनलाईन बहाणा
पुणे : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका ४९ वर्षीय व्यक्तीची तब्बल ६२ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ऑनलाईन माध्यमातून जाळ्यात ओढून सायबर चोरट्यांनी हा मोठा डल्ला मारला असून, याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या एका ४९ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल धारक, संबंधित बँक खातेधारक आणि वापरकर्त्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१९(२), ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा कलम ६६(डी) नुसार गुन्हा नोंदवला आहे. ही फसवणूक २४ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत करण्यात आली.
गुंतवणुकीच्या नावाखाली घातला गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले होते. सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी शेअर बाजारातील नफ्याचे खोटे आकडे आणि आलेख दाखवले. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे भासवून चोरट्यांनी फिर्यादीला वेळोवेळी मोठ्या रकमा भरण्यास प्रवृत्त केले.
६२ लाखांना लावला चुना
आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी एकूण ६२ लाख १ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा केले. मात्र, जेव्हा त्यांनी आपला नफा आणि मूळ रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकारात वापरलेले मोबाईल क्रमांक आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले, त्यावरून पोलीस आता आरोपींचा माग काढत आहेत.
सायबर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता देवकाते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




