राजस्थानच्या पंचायत राज निवडणुकांत काँग्रेसची मुसंडी; सत्ताधारी भाजपला धक्का, राहुल गांधींचा ‘डबल इंजिन’वर निशाणा
• पंचायत समितीत काँग्रेसचे 3,701 तर भाजपचे 2,181 विजयी उमेदवार; जिल्हा परिषदेत 37 पैकी 24 जिल्ह्यांत काँग्रेसची आघाडी
3 मिनिट वाचन

नवी दिल्ली :- राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर निर्णायक आघाडी घेतली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निकालांमुळे ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर आणि कारभारावर जोरदार टीका केली आहे.
निवडणूक निकालांचे चित्र आणि प्रमुख जिल्ह्यांचा कल
राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 37 जिल्ह्यांतील 7,543 पंचायत समिती जागांपैकी 7,393 जागांचे आणि 1,275 जिल्हा परिषद जागांपैकी 981 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत:
* *पंचायत समिती:* काँग्रेसने 3,701 जागांवर विजय मिळवला असून भाजपला 2,181 जागांवर यश मिळाले आहे.
* *जिल्हा परिषद:* काँग्रेसने 599 जागा जिंकल्या असून भाजपला 301 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 37 पैकी 24 जिल्ह्यांत जिल्हा परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ भाजपपेक्षा अधिक राहिले आहे.
महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. जयपूरमध्ये काँग्रेसने 216 विरुद्ध 87, जोधपूरमध्ये 195 विरुद्ध 81, सीकरमध्ये 179 विरुद्ध 87, भीलवाड्यात 165 विरुद्ध 111, बिकानेरमध्ये 155 विरुद्ध 65 आणि दौसात 135 विरुद्ध 59 अशा फरकाने पंचायत समितीच्या जागा जिंकल्या आहेत. पश्चिम राजस्थानमधील बाडमेर (120 विरुद्ध 62), जैसलमेर (89 विरुद्ध 36) आणि राजसमंद (97 विरुद्ध 58) येथेही काँग्रेस पुढे राहिली. दुसरीकडे अजमेर, ब्यावर, डूंगरपूर, झालावाड, पाली आणि उदयपूर या 6 जिल्ह्यांत भाजपने आघाडी घेतली.
राहुल गांधींचा ‘डबल इंजिन’ सरकारवर हल्लाबोल ; “हा केवळ राजस्थानचा कौल नाही, तर देशातील प्रत्येक गावाचा आवाज”; मनरेगा, शेतकरी व महागाईचा मुद्दा उपस्थित
निकालांनंतर सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार राहुल गांधी यांनी ग्रामीण राजस्थानच्या मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, “पंचायत निवडणुकांमध्ये तुम्ही काँग्रेसवर जो विश्वास दाखवला आहे, ती आता आमची जबाबदारी आहे. हा प्रतिसाद अशा राज्यातून आला आहे, जिथे भाजपचे स्वतःचे सरकार आहे, हे ‘डबल इंजिन’ला थेट दिलेले उत्तर आहे. भाजपने मनरेगावर (MGNREGA) हल्ला केला, शेतकऱ्यांना तोट्यात ढकलले आणि पंचायतींचे अधिकार काढून घेतले. महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतरामुळे गावे ओसाड पडली आहेत. गावे सगळे काही पाहत होती, सगळे काही सहन करत होती; आता त्यांनी आपला आवाज उठवला आहे. हा केवळ राजस्थानचा कौल नाही, तर हा देशातील प्रत्येक गावाचा आवाज आहे.”
गैरकारभार व भ्रष्टाचारावरून गेहलोत आणि प्रदेश काँग्रेसची टीका ; सरकारच्या तीन वर्षांच्या कारभारावर ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांचा निशाणा; विजयाची लाट वादळात रूपांतरित होण्याचा दावा
ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात जनतेने हा निकाल ‘भेट’ म्हणून दिला आहे. गैरकारभार, रखडलेली कामे, वाढता भ्रष्टाचार आणि तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जनतेत संताप निर्माण झाला होता, असे ते म्हणाले.
दरम्यान, राजस्थान प्रदेश काँग्रेसनेही हा निकाल भाजपच्या भ्रष्टाचार आणि कथित अराजकतेविरोधातील जनसंतापाचा पुरावा असल्याचे सांगत, विजयाची ही लाट पुढे वादळात रूपांतरित होईल, असा दावा केला आहे.




