मुंबई महापालिकेला पुन्हा धमकीचा ई-मेल; ‘जलसा’ बंगल्यासह मेट्रो स्टेशन व रेस कोर्स उडवण्याची धमकी
• सकाळी 10.12 वाजता महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर धडकला धमकीचा संदेश; महालक्ष्मी व सायन्स आचार्य मेट्रो स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा दावा, गेल्या चार महिन्यांत पाचव्यांदा आली धमकी
2 मिनिट वाचन

मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने मुंबईसह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी 10 वाजून 12 मिनिटांच्या सुमारास महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश धडकला असून, यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्यासह शहरातील विविध महत्त्वाची आणि वर्दळीची ठिकाणे लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिका मुख्यालय व ‘जलसा’ बंगला उडवण्याची धमकी
समोर आलेल्या माहितीनुसार, धमकीच्या या ई-मेलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला तसेच महालक्ष्मी रेस कोर्स हे ठिकाणही उडवून टाकण्याचा स्पष्ट उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, मुंबईतील महालक्ष्मी आणि सायन्स आचार्य मेट्रो स्टेशनवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा खळबळजनक दावाही या ई-मेलद्वारे करण्यात आला आहे.
चार महिन्यांत पाचव्यांदा धमकीचा मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेला धमकीचा ई-मेल येण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वीही महापालिका प्रशासन आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित अशाच प्रकारच्या धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले होते. वारंवार येणाऱ्या या धमक्यांच्या ई-मेलमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस प्रशासन नेमक्या कोणत्या कायमस्वरूपी व ठोस सुरक्षा उपाययोजना राबवणार, तसेच या ई-मेलमागील सूत्रधारांचा शोध कसा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




