मेट्रोच्या पिलरवरील जाहिरातींमधून पालिकेच्या तिजोरीत ३.४० कोटी
शहरातील विविध मेट्रो मार्गावर मेट्रो स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात एकूण ३१ जागा पार्किंगसाठी आरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले
1 मिनिट वाचन

शहरातील विविध मेट्रो मार्गावर मेट्रो स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात एकूण ३१ जागा पार्किंगसाठी आरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले
निलेश राऊत
पुणे: शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या पिलरवर लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांमधून पुणे महापालिकेला गेल्या दीड वर्षात सुमारे ३ कोटी ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने ही माहिती दिली आहे. पुणे शहरातील विविध मेट्रो मार्गावर मेट्रो स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात एकूण ३१ जागा पार्किंगसाठी आरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यामध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांचा समावेश आहे. या जागांचा ताबा घेऊन तिथे वाहनतळ विकसित करण्याचे नियोजन महापालिका करत आहे. शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या पिलरवर लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांमधून १ ऑक्टोबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत पालिकेला १ कोटी १५ लाख ७५ हजार ६८० रुपये मिळाले. त्यानंतर, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात उत्पन्नात मोठी वाढ होऊन ही रक्कम २ कोटी २५ लाख १८ हजार ३१५ रुपयांवर पोहोचली. अशा प्रकारे एकूण ३ कोटी ४० लाख ९३ हजार ९९५ रुपये जाहिरात शुल्काच्या स्वरूपात महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे असे लेखी उत्तर नगरसेवक दिनेश माथवड यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले आहे.
तत्कालीन महापालिका आयुक्त आणि पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यात झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन जाहिरात फलकांना मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ही शुल्क आकारणी केली जात आहे.




