पुण्यात भूजल सर्वेक्षणचे दोन वरिष्ठ अधिकारी एसीबी’च्या जाळ्यात
दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
1 मिनिट वाचन

दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
पुणे: शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक अशा दोन राजपत्रित अधिकाऱ्यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी (Occupancy Certificate) आवश्यक असलेला भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी (ता. २४) ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी दिवाकर नामदेव धोटे (वय ५३, वरिष्ठ भूवैज्ञानिक - वर्ग १) आणि प्रियंका संदिपान घुले (वय ३९, कनिष्ठ भूवैज्ञानिक - वर्ग २) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. यातील ४६ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने यासंदर्भात तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी 'पीएमआरडीए’कडे (PMRDA) अर्ज केला होता. पीएमआरडीएने त्यांना भूजल सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास सांगितले. हा अहवाल मिळवण्यासाठी तक्रारदारांनी शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण विभागाकडे अर्ज केला. हा अहवाल देण्यासाठी कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका घुले यांनी वरिष्ठ अधिकारी दिवाकर धोटे यांच्यासाठी अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने २२ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. 'एसीबी’ने या तक्रारीची पडताळणी केली असता, धोटे यांनी पंचांसमक्ष तडजोडीनंतर २ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आणि ही रक्कम घुले यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी शिवाजीनगर येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रियंका घुले यांना रंगेहात पकडण्यात आले, तर दिवाकर धोटे यांनाही कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, खंडेराव रंजवे आणि त्यांच्या पथकाने केली.
Two senior groundwater survey officers in Pune caught by ACB




