कोंढव्यात २२ किलो गांजा जप्त; दोघे जेरबंद
सुमारे ९.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1 मिनिट वाचन

सुमारे ९.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे: कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विक्रीविरोधात मोठी कारवाई करत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पथकाने तब्बल २२ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एक महिला आणि एका तरुणाला अटक करण्यात आली असून, एकूण सुमारे ९.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ०५ पथक कार्यरत होते.
दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की, कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर भागात एका महिला आणि पुरुषाकडून गांजाची विक्री सुरू आहे. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला.
छाप्यामध्ये आरोपी
यास्मीन करीम शेख (वय ४५) आणि आमिर समीर शेख (वय १९) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २१.१९८ किलो गांजा (बिया-बोंड्यासह), रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण ९,७४,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ नोंद करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क), २०(ब), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पोलीस उप आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत परिमंडळ ०५ पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
कोंढवा परिसरातील अंमली पदार्थांविरोधातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, पोलिसांनी अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.




