शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी कशासाठी करता? ; सुधीर मुनगंटीवारांचा पोलिसांना संतप्त सवाल, ऑडिओ क्लिप व्हायरल
शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी कशासाठी करता? असा संतप्त सवाल भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांना केला आहे.
1 मिनिट वाचन

चंद्रपूर : शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी कशासाठी करता? भाजपला संपवायला निघालेत का? असा संतप्त सवाल भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांना केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी (MIDC) सुरू असलेल्या जमीन मोजणीवरून हा वाद निर्माण झाला आहे. मुनगंटीवार आणि पोलिसांमधील मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित MIDC प्रकल्पासाठी १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. असे असतानाही प्रशासनाकडून मोजणी सुरू करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
चेकबोरगाव आणि धानापूर परिसरात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत आपला विरोध नोंदवला. यावेळी धानापूर येथील शेतकरी बालू बोनगिरवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
त्यानंतर मुनगंटीवार यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर संवाद साधला. शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी करण्याची गरज काय, असा सवाल करत त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. त्यांच्या या संतप्त प्रतिक्रियेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




