मुख्य मजकुराकडे जा

टिंबर मार्केमध्ये ५० ते ६० दुकाने जळून खाक, मोठी दुर्घटना टळली

पुण्यातील महात्मा फुले पेठेतील टिंबर मार्केट परिसरात बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

टिंबर मार्केमध्ये ५० ते ६० दुकाने जळून खाक, मोठी दुर्घटना टळली
पुण्यातील महात्मा फुले पेठेतील टिंबर मार्केट परिसरात बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

पुणे, धनश्री ओतारी

पुण्यातील महात्मा फुले पेठेतील टिंबर मार्केट परिसरात बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. जय वल्लभ शाळा आणि अंगारशाह तकिया परिसराजवळ असलेल्या लाकूड व लाकडी वस्तूंच्या दुकानांना लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत सुमारे ५० ते ६० दुकानांना आगीची तीव्र झळ बसली असून, कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

पहाटे २ वाजता लागली आग

जय वल्लभ शाळेजवळ लाकडाची दुकाने आणि लाकडी वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी बाजारपेठ आहे. बुधवारी पहाटे २ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास या परिसरात अचानक आग लागली. परिसरात मोठ्या प्रमाणावर लाकूड, फर्निचर आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली. काही मिनिटांतच आगीने अनेक दुकानांना आपल्या विळख्यात घेतले आणि आकाशात धुराचे लोळ पसरले.

२७ अग्निशमन वाहनांचा चारही बाजूंनी पाण्याचा मारा

आगीची भीषणता लक्षात घेऊन पुणे महानगरपालिका अग्निशमन दल, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या अग्निशमन यंत्रणा तातडीने कामाला लागल्या. एकूण २७ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

सुमारे १५० हून अधिक जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी दोन तास शर्थीचे प्रयत्न केले. आगीच्या घटनास्थळा लगतच दाट रहिवासी वसाहत असल्याने, आग घरांपर्यंत पोहोचू नये यासाठी अग्निशमन दलाने विशेष खबरदारी घेतली. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर पुन्हा आग भडकू नये म्हणून कुलिंग ऑपरेशन राबवण्यात आले.

महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून घटनास्थळी पाहणी

महात्मा फुले पेठेतील या दुर्घटनेची माहिती मिळताच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बचावकार्याची सविस्तर माहिती घेतली. तसेच, नुकसानग्रस्त व्यापारी आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभे राहिलेले व्यवसाय एका आगीत उद्ध्वस्त होणे अत्यंत वेदनादायी आहे. संकटसमयी पुणे महानगरपालिका प्रशासन बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत व सहकार्य लवकरात लवकर उपलब्ध करून दिले जाईल. अशी ग्वाही यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.

या संपूर्ण मदतकार्यात मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने, उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, तसेच राज्याच्या विविध विभागांचे अधिकारी व १५० हून अधिक जवान सहभागी झाले होते. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गुरम, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस दल, १०८ रुग्णवाहिका सेवा, महावितरण, पाणीपुरवठा विभाग आणि स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात मोलाचे सहकार्य केले.

या दुर्घटनेत ५० ते ६० दुकानांचे मोठे नुकसान झाले असले, तरी नेमके आर्थिक नुकसान किती झाले याचे अधिकृत मूल्यांकन अजून समोर आलेले नाही. तसेच, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारणही अद्याप अस्पष्ट असून पोलीस व अग्निशमन दल त्याबाबतचा तपास करत आहेत. टिंबर मार्केटसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी लागलेली ही आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper