मुख्य मजकुराकडे जा

एफसी रस्त्यावरील अतिक्रमणावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

बांगलादेशी घुसखोर’ आणि ‘दाढी-शेंडी’वरून भाजप-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

एफसी रस्त्यावरील अतिक्रमणावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
बांगलादेशी घुसखोर’ आणि ‘दाढी-शेंडी’वरून भाजप-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या मुख्यसभेत चांगलाच गाजला. सुरुवातीला सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. मात्र, या चर्चेत राजकीय आरोपांची भर पडल्याने सभागृहातील वातावरण तापले.

पुण्यातील महत्त्वाचा शैक्षणिक आणि व्यापारी केंद्रबिंदू असलेल्या एफसी रस्त्यावरील पदपथांवर अनधिकृत विक्रेते आणि स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणावर कब्जा केला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही जिकिरीचे झाले आहे. याप्रश्नी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यसभेत आंदोलन केले. सभागृहात फलक झळकावत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

या चर्चेत सहभागी होताना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांच्या ओळखीबाबत संशय व्यक्त केला. एफसी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व विक्रेत्यांची आधार कार्ड, नागरिकत्वाची कागदपत्रे आणि व्यवसाय परवानग्यांची सखोल तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच, अतिक्रमणांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचे या विक्रेत्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी घाटे यांनी लावून धरली. (दरम्यान, संबंधित विक्रेते बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचा कोणताही अधिकृत तपास अहवाल अद्याप समोर आलेला नाही.)

“बांगलादेशी आणि काँग्रेसचे जवळचे नाते आहे,” असा गंभीर आरोप भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी करताच, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी “आम्ही दाढ्या कुरवाळतो की शेंडी धरतो, ते तुम्ही सांगू नका,” अशा शब्दांत पलटवार केला. या शाब्दिक चकमकीमुळे नागरी प्रश्नावरील चर्चेला तीव्र राजकीय वळण मिळाले.

''सत्ताधाऱ्यांवर सभागृहात आंदोलन करण्याची वेळ का यावी?” काँग्रेसचा सवाल

घाटे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. “राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्वतःच्याच नगरसेवकांवर सभागृहात आंदोलन करण्याची वेळ का यावी?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. अतिक्रमणाची समस्या केवळ एफसी रस्त्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवर पक्षपात न करता कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही लोकप्रतिनिधीने यात हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. या वादादरम्यान ‘दाढ्या कुरवाळण्या’चा उल्लेख आल्यानंतर शिंदे यांनी आक्रमक होत भाजपच्या भूमिकेवर ‘आम्ही दाढ्या कुरवाळतो की शेंडी धरतो, ते तुम्ही सांगू नका,’ असे सांगत त्यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले.

कठोर कारवाईची मागणी

चर्चेदरम्यान काही अनधिकृत विक्रेत्यांकडून विद्यार्थिनी आणि महिलांशी गैरवर्तन होत असल्याच्या तक्रारी आणि समाजमाध्यमांवरील व्हिडिओंचाही उल्लेख करण्यात आला. या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.

सभागृहातील तीव्र भावना लक्षात घेऊन महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला कडक शब्दांत समज दिली. यापूर्वी बैठका होऊनही प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा का झाली नाही, अशी विचारणा करत त्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले. त्यावर उत्तर देताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पोलिसांच्या मदतीने एफसी रस्त्यासह संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर व्यापक मोहीम राबवण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

मुख्यसभेतील गदारोळ आणि महापौरांच्या निर्देशांनंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तातडीने पावले उचलली. दुपारनंतर एफसी रस्ता आणि शिवाजीनगर परिसरातील अनधिकृत स्टॉल, टपऱ्या आणि पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, ही मोहीम केवळ एका दिवसापुरती न राहता पुणेकरांना कायमस्वरूपी मोकळे पदपथ मिळणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper