मुख्य मजकुराकडे जा

महापौर-आयुक्त कलगीतुरा आणि एफसी रोडवर अतिक्रमण विरोधी कारवाई

नगरसेवकांसह महापौरांचे अधिकाऱ्यांवर आरोप आयुक्तांच्या लागले जिव्हारी; तासाभरातच आयुक्त एफसी रोडवर

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

4 मिनिट वाचन

महापौर-आयुक्त कलगीतुरा आणि एफसी रोडवर अतिक्रमण विरोधी कारवाई
नगरसेवकांसह महापौरांचे अधिकाऱ्यांवर आरोप आयुक्तांच्या लागले जिव्हारी; तासाभरातच आयुक्त एफसी रोडवर

नगरसेवकांसह महापौरांचे अधिकाऱ्यांवर आरोप आयुक्तांच्या लागले जिव्हारी; तासाभरातच आयुक्त एफसी रोडवर

महत्वाचे मुद्दे

*एफसी रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला

*नगरसेवकांची बाजू ऐकल्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत 'पुणे सोडण्याचा' थेट इशारा दिला

*भाजपच्या नगरसेवकांनीच महापालिका अधिकाऱ्यांवर 'हप्ता वसुलीचा' गंभीर आरोप करत सभागृहात आंदोलन केले

*महापौरांच्या आक्रमक पवित्र्याला महापालिका आयुक्तांनी तितक्याच ठामपणे प्रत्युत्तर देत अधिकाऱ्यांची पाठराखण केली

*आयुक्तांच्या उपस्थितीत अतिक्रमणांवर कारवाई करत २४ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली

*

"पुणेकरांना त्रास होणार नाही ही आपली जबाबदारी आहे. ज्यांना काम करायचे नाही, त्यांनी पुणे सोडून बाहेर काम शोधावे." - मंजुषा नागपुरे, महापौर

पुणे, धनश्री ओतारी

नगरसेवक आणि अधिकारी यांनी गांभीर्याने घेतले तर शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ दूर केली जाऊ शकतात याचा प्रत्यय मंगळवारी (ता. १७) नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज - एफसी) रस्त्यावर आला.

एफसी रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. विशेष बाब म्हणजे, नगरसेवकांची बाजू ऐकल्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत 'पुणे सोडण्याचा' थेट इशारा दिला. तसेच भाजपच्या नगरसेवकांनीच महापालिका अधिकाऱ्यांवर 'हप्ता वसुलीचा' गंभीर आरोप केला.

या सर्व घडामोडीनंतर आयुक्त नवलकिशोर राम काही तासांतच अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतः फर्ग्युसन रोडवर उतरल्याचे पाहायला मिळाले. आयुक्तांची ही भूमिका पाहात नगरसेवकांसह महापौरांचे आरोप आयुक्तांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा दबक्या आवाजात पालिकेच्या वर्तुळात सुरु होती.

मुख्य सभेत अधिकाऱ्यांवर हप्ते वसुलीचा आरोप

एफसी रोड पदपथांवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून भाजपच्याच नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात आंदोलन केले. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करूनही अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नसल्याबद्दल नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास, वाहतुकीची कोंडी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

काही महापालिका अधिकारी विक्रेत्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला. तसेच कारवाईदरम्यान जप्त केलेला माल दंड न आकारता पुन्हा संबंधित विक्रेत्यांना परत दिला जात असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे अतिक्रमणाविरोधातील कारवाई प्रभावी होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी

नगरसेवकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. "अतिक्रमणांच्या तक्रारी घेऊन नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी वारंवार अधिकाऱ्यांकडे जातात, पण तिथे केवळ तात्पुरती कारवाई करून वेळ मारून नेली जाते. जाब विचारल्यावर 'पुणे खूप विस्तारले आहे, कामाचा लोड आहे,' अशी कारणे दिली जातात," अशा शब्दांत महापौरांनी प्रशासनाचा पंचनामा केला.

एवढ्यावरच न थांबता महापौरांनी थेट अधिकाऱ्यांच्या बदलीचा किंवा शहर सोडण्याचा इशारा दिला. "पुणेकरांना त्रास होणार नाही ही आपली जबाबदारी आहे. ज्यांना काम करायचे नाही, त्यांनी पुणे सोडून बाहेर काम शोधावे," असा सज्जड दम भरत त्यांनी आयुक्तांनाही अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

नगरसेवकांसह महापौरांचे आरोप आयुक्तांच्या जिव्हारी

दरम्यान, सभा सुरु असतानाच शिवाजीनगर, गोखले रस्ता परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली. तर तासाभरातच महापालिका आयुक्त राम स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांच्या उपस्थितीत अतिक्रमणांवर ‘जेसीबी’च्या साह्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २४ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. दुपारी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या कारवाईत अनधिकृत दुकाने, हातगाड्या, पथारी आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईपासून वाचण्यासाठी काही व्यावसायिकांनी इतर दुकानांमध्ये विक्रीचे साहित्य लपवून ठेवले. कारवाईसाठी रस्त्यावर उतरलेल्या महापालिका आयुक्तांची नजर तेथे गेली. त्यांनी हे साहित्य लपवून ठेवलेल्या खोलीलाच टाळे ठोकले.

महापालिका आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरल्याने या कारवाईची तीव्रता अधिक वाढली. महापालिकेची कारवाई सुरू असल्याचे फोन संबंधित व्यावसायिकांना गेल्यानंतर अनेक व्यावसायिक या रस्त्यावर फिरकलेच नाही. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी या रस्त्यावरील पदपथांवरून नागरिक सुरक्षितपणे चालत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महापौरांच्या इशाऱ्याला आयुक्तांचे 'नियमांचे' प्रत्युत्तर

महापौर मंजुषा नागपुरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, महापौरांच्या या आक्रमक पवित्र्याला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी तितक्याच ठामपणे प्रत्युत्तर देत आपल्या अधिकाऱ्यांची पाठराखण केली. या दोघांमधील परस्परविरोधी भूमिकांमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

महापौरांनी मुख्य सभेत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी माध्यमांसमोर येत प्रशासनाची बाजू भक्कमपणे मांडली. महापौरांच्या टीकेला अप्रत्यक्ष आव्हान देताना आयुक्त म्हणाले की, "माझे सर्व अधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगले काम करत आहेत. ते कोणत्याही दबावाखाली येऊन काम करत नाहीत."

लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार सरसकट कारवाई होणार नाही, याचे संकेत देताना आयुक्तांनी नियमांवर बोट ठेवले. "जी काही कारवाई होईल ती केवळ नियमात बसत असेल तरच होईल. नियमात असेल तर क्षणाचाही विलंब न लावता कारवाई केली जाईल, पण नियमाबाहेर जाऊन कोणतीही कारवाई केली जाणार नाही," असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.

लोकप्रतिनिधींना आपल्या प्रभागातील अतिक्रमणे तात्काळ हटवून नागरिकांचा रोष शांत करायचा आहे, तर दुसरीकडे प्रशासन केवळ तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर अडून बसले आहे. महापौरांनी थेट 'पुणे सोडण्याची' भाषा वापरल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली होती. त्यावर आयुक्तांनी स्वतः मैदानात उतरून अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद आता 'पदाधिकारी विरुद्ध प्रशासन' असा रंगला आहे.

आगामी काळात या वादाचे पडसाद पालिकेच्या कामकाजावर आणि शहरातील विकासकामांवर कसे उमटतात, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper