“गेल्या १२ वर्षांपासून माझा शपथविधी होतोय”; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
एनडीएमध्ये जाण्याच्या बदल्यात मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याची चर्चा फेटाळली; रोहित पवारांच्या कथित गुप्त बैठकीवरही स्पष्ट भूमिका
2 मिनिट वाचन

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. त्यातच एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या बदल्यात शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची चर्चा सुरू झाली. या सर्व चर्चांवर आता स्वतः सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उपरोधिक शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “गेली १२ वर्षे माझा शपथविधी होतोय. माझ्यावर अन्याय करू नका. २०१४ पासून मी मुख्यमंत्री होतेय. मला या कुठल्याही कथांमध्ये रस नाही.” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, राजकीय पदांच्या चर्चांपेक्षा संसदेत धोरणात्मक काम करण्याला आपण अधिक महत्त्व देत असल्याचेही त्यांनी सांगितले. “मला फक्त एका गोष्टीचे दुःख आहे की, ज्या पॉलिसी मेकिंगसाठी मी संसदेत निवडून गेले, त्याबद्दल गांभीर्याने कोणी विचारत नाही. सध्या मी चार संयुक्त संसदीय समित्यांवर काम करत असून, देशाचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या वित्तीय समितीमध्येही माझा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळत आहे. त्याबाबत प्रश्न विचारले तर मला अधिक आनंद होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील दुष्काळ आणि देशपातळीवरील महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीच्या चर्चेला हास्यास्पद ठरवले
दुसरीकडे, आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात राजकीय मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेगाव ते नागपूर शेतकरी मोर्चाचे नियोजन सुरू असताना त्यांनी नागपुरात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेतल्याची माहिती समोर आली होती. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना फेटाळून लावले. “रोहित पवार आणि गुप्त बैठक म्हणजे काय? रोहित पवार काल नागपूरला गेले होते. त्यांचे लाइव्ह लोकेशन तपासा. पक्षाची गुप्त बैठक वगैरे म्हणणे हास्यास्पद आहे. राज्यासमोर दुष्काळाचे एवढे मोठे संकट असताना मला अशा गॉसिपमध्ये वेळ घालवायचा नाही,” असे म्हणत त्यांनी या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाची २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत शेतकरी मोर्चा आणि पक्षाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र मिरर




