भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीच्या वक्तव्यावर काँग्रेसचे आंदोलन

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी आणि सरसंघचालक भागवत यांच्या उपस्थितीत असे वक्तव्य झाले तरी त्यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया न देणे हे खेदजनक असल्याचे प्रतिपादन
निलेश राऊत
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. २७ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले असून संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आयोजित या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबाच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण असून त्यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना सरकारने पाठीशी घालणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत असे वक्तव्य झाले तरी त्यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया न देणे हे खेदजनक असल्याची टीका त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, अजित दरेकर, मेहबुब नदाफ, यशराज पारखी, नगरसेविका दिपाली डोख, अश्विनी लांडगे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, संगीता पवार, प्राची दुधाणे, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, मोहसीन शेख, ॲन्थोनी जेकब, मिलिंद पोकळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, संबंधित वक्तव्याबाबत राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
Congress protests over Bhondubaba Dhirendra Shastri's statement


