विषारी दारू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्या: नीलम गोऱ्हे

पीडित कुटुंबांना रोख तातडीची आर्थिक मदत सुपूर्द
पिंपरी: फुगेवाडी व हडपसर परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, या घटनेला जबाबदार असलेल्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना नेत्या व आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच शिवसेनेच्या वतीने पीडित कुटुंबांना रोख तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, इरफान सय्यद, महिला जिल्हा प्रमुख मनिषा परांडे, निलेश हाके आदी यावेळी उपस्थित होते.

१३ कुटुंबांना मदत करण्यात आली
या दौऱ्यादरम्यान फुगेवाडी येथील अक्षय अशोक अवसरमल, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, आनंद काशिनाथ निकाळजे, आनंद पांडेराव देसाई, अकबर अझीमखान पठाण, राजेश शांताराम राजपूत, सचिन रामचंद्र नेटके आणि बाबा सैय्यद हुसेन शेख यांच्या शोकाकुल कुटुंबांना भेटून मदत देण्यात आली. हडपसर येथील चार परिवीरांना ३० मे रोजी गोऱ्हे यांनी आर्थिक मदतीचे चेक दिले. ऊर्वरित हडपसर येथील व फुगेवाडीतील उर्वरित पीडित कुटुंबांनाही लवकरच मदत दिली जाईल, असे गोऱ्हे यांनी सांगितले. आतापर्यंत दोन्ही भागांतील जवळपास १३ कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.
केवळ हातभट्टी नव्हे, विषारी पुरवठा साखळीचा तपास व्हावा
माध्यमांशी बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रात अशा घटना घडल्यानंतर प्रत्येक वेळी विधिमंडळात चर्चा होते. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा हवी. हा केवळ एका हातभट्टीचा प्रश्न नसून मिथेनॉलसारख्या घातक रसायनांचा पुरवठा कुठून झाला, याची संपूर्ण ‘सप्लाय चेन’ शोधणे आवश्यक आहे. रासायनिक तपासणी अहवाल तातडीने समोर यायला हवेत आणि सक्षम सरकारी वकील नियुक्त करून खटला जलदगती न्यायालयात चालवला पाहिजे.”


