क्राईम न्यूजपुणेमहाराष्ट्र

पुणे स्टेशन परिसरात डल्ला

झोपलेल्या तरुणाच्या हातातील ३ लाखांचे सोन्याचे कडे लंपास

पुणे: पुणे स्टेशन परिसरातील राजा बहादूर मिल्सच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीत झोपलेल्या एका तरुणाच्या हातातील ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे कडे अज्ञात चोरट्याने शिताफीने चोरून नेले. शनिवारी (ता. ११) रात्री ही धाडसी चोरी झाली असून, वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी वारजे येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

गाढ झोपेचा चोरट्याने घेतला फायदा
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामानिमित्त पुणे स्टेशन परिसरात आले होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांनी आपली गाडी राजा बहादूर मिल्सच्या पार्किंगमध्ये उभी केली आणि ते गाडीतच विश्रांती घेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना गाढ झोप लागली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे कडे अत्यंत शिताफीने काढून घेतले आणि तिथून पसार झाला.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
रविवारी पहाटे दीडच्या सुमारास फिर्यादीला जाग आली असता, त्यांच्या हातातील दागिना चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र चोरट्याचा सुगावा लागला नाही. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्याचा माग काढत आहेत. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button