सोलापूरक्राईम न्यूज

Solapur Crime News : सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्धवस्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त; पाच आरोपी अटकेत

सोलापूर, महाराष्ट्र मिरर Solapur Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘ऑपरेशन समन्वय’ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात मोठी धडक कारवाई करत तीन गोदामांसह बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्धवस्त केला. या कारवाईत २ कोटी १ लाख ४५ हजार २८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर विभागाने आजवर केलेल्या कारवायांपैकी ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.Solapur Crime News

राज्य उत्पादन शुल्क विभागाने २९ जुलै रोजी चिंचोली एमआयडीसी परिसरात छापा टाकून बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना उघडकीस आणण्यात आला. या कारवाईदरम्यान ९० मिली क्षमतेच्या टँगो पंच या बनावट देशी मद्याच्या ४१ हजार ३०० सिलबंद बाटल्या, भिंगरी ब्रँडच्या २ हजार बाटल्या, १३ हजार ८०० लिटर स्पिरीट, १ हजार २०० लिटर तयार ब्लेंड, ३२६ बॉक्स बनावट प्लास्टिकच्या बाटल्या, १ लाख ६५ हजारांहून अधिक बनावट लेबले, १३ लाखांहून अधिक बनावट बुचे, ऑटोमॅटिक व सेमी-ऑटोमॅटिक बॉटलिंग मशिन, आरओ प्लांट, जनरेटर, इलेक्ट्रिक मोटारी, प्रिंटिंग मशिन तसेच बनावट मद्यनिर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिकअप, दोन कार आणि तीन दुचाकी अशा एकूण सात वाहनांसह २ कोटी १ लाख ४५ हजार २८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या अवैध व्यवसायामुळे शासनाच्या ७० लाख ४० हजार ५८७ रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, कारखान्यासाठी भाड्याने देण्यात आलेल्या गोदामांच्या मालकांनाही सहआरोपी करण्यात आले आहे.Solapur Crime News

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जे.एन.पाटील,.ए.व्ही. घाटगे, दुय्यम निरीक्षक आर. के. निंबाळकर,.डी. आर. पोवार,.ए.बी.सरवदे, एस.बी.सिद, .एस.बी. शेळके,.एस.डी. कांबळे, विकास थोरात, दिलीप सानप, जवान अनिल पांढरे, चेतन वनगुंटी, प्रशांत इंगोले, गजानन ढब्बे, कपील स्वामी, आण्णा कर्चे, स्वप्नील आरमाळ, मंगेश मारसिंग, शेरखाने, वाहनचालक सलगर, सानप, वाघमारे, नवले व अकार्यकारी घटकावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पार पाडली.

इतर जिल्ह्यातही बनावट दारूचा पुरवठा

प्राथमिक तपासात या बनावट मद्याचा पुरवठा सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे अंधत्व, किडनी निकामी होणे असे गंभीर परिणाम होण्याबरोबरच मृत्यूदेखील होऊ शकतो.

नागरिकांनी अमिषाला बळी पडू नये

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेटसारख्या घातक रसायनांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ विभागाला कळवावे. तसेच, कोणत्याही अमिषाला बळी न पडता संशयास्पद हालचालींची माहिती टोल-फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर देण्याचे आवाहन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button