Pune crime : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा तरुण कोंढव्यात जेरबंद
Pune crime : संडे बाजार परिसरात कारवाई
Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोंढवा परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या तरुणाला कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ५० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमन जमील खान (वय २७, रा. इनामनगर, तालाब, कोंढवा बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी (दि. १८) रात्री गस्त घालत असताना पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण आणि केशव हिरवे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने साईबाबानगर येथील संडे बाजार परिसरात सापळा रचून अमन खान याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी शस्त्र व काडतूस जप्त केले.
पिस्तूल कोणाकडून मिळवले, याबाबत चौकशी केली असता आरोपीने ते कोंढवा बुद्रुक येथील मक्का मशिदीजवळ राहणाऱ्या वसीम शकील खान ऊर्फ वस्सू याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. या माहितीची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष मासाळ हे पुढील तपास करत आहेत.


