पुणे

Pune News : पुणे-सोलापूर महामार्गाचा होणार कायापालट

Pune News : हडपसर-यवत उन्नत मार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे-सोलापूर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या हडपसर ते यवत ३१.५ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्ग (एलेव्हेटेड कॉरिडॉर) प्रकल्पाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रस्तावित महामार्गासाठी भूसंपादनाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, हवेली आणि दौंड तालुक्यांमधील अतिरिक्त ३० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या जमिनींचे सर्वेक्षण क्रमांक जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संतोष बांपेलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जमिनींच्या थेट मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

डबलडेकर उड्डाणपूल अन् मेट्रो मार्गिका

हडपसर ते यवत दरम्यान उभारला जाणारा हा ३१.५ किमी लांबीचा मार्ग आधुनिक वाहतूक संरचनेचे उत्तम उदाहरण ठरणार आहे. या प्रकल्पात ‘डबलडेकर’ उड्डाणपुलाचा समावेश आहे. सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण करून ६ पदरी मार्गिका असेल. चार पदरी उन्नत महामार्ग तयार केला जाईल. तर भविष्यातील मेट्रो विस्तारासाठी याच रचनेवर स्वतंत्र मेट्रो मार्गिकेची तरतूद करण्यात आली आहे.

प्रकल्पाचा भाग म्हणून नियोजित मेट्रो स्टेशन्स, बस टर्मिनल्स, उड्डाणपुलांचे जंक्शन्स आणि मुख्य महामार्गाला जोडणारे पोचमार्ग उभारण्यासाठी या अतिरिक्त ३० हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे.

हवेली तालुक्यातील आठ गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील हडपसर , मंजरी बुद्रुक , कदमवाक वस्ती , लोणी काळभोर , कुंजीरवाडी , सोरतापवाडी , कोरेगाव मूळ , उरुळी कांचन या गावांमध्ये प्राथमिक जमीन सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि नागरिकांना भरपाई वितरणाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी हवेली व दौंड तालुक्यांत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button