पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : १ नोव्हेंबरपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उतरविण्यास कामगारांचा नकार

Pune News : मार्केट यार्डात जनजागृती रॅली; कामगारांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सर्व संघटना आक्रमक

Pune News :पुणे : कामगारांच्या आरोग्याशी तडजोड नाही, असा ठाम निर्धार करत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील फळ-भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभागातील कामगार संघटना एकवटल्या आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमधील शेतीमाल उतरवून न घेण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी कामगारांच्या वतीने बाजार आवारात जनजागृती रॅली काढण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनच्या पुढाकाराने आयोजित या रॅलीत विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमधून शेतीमाल आणण्यास प्रतिबंध करणारा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य शासनानेही आदेश काढला आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कामगार संघटनांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने करून पाठपुरावा केला आहे.

अतिवजनाच्या गोण्या उचलताना कामगारांच्या मणक्यावर, गुडघ्यांवर आणि मानेवर ताण येत असून, अनेकांना गंभीर शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ५० किलोची वजनमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी करण्यात आली.

“१ नोव्हेंबरपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या कोणत्याही परिस्थितीत उतरवून घेतल्या जाणार नाहीत. तसेच, इतर कोणालाही त्या उतरवू दिल्या जाणार नाहीत,” असा इशारा युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिला.

या रॅलीत विशाल केकाणे, सूर्यकांत चिंचवले, संजय साष्टे, दीपक जाधव, भरत शेळके, शंकर कसबे, गणेश शिर्के, महेश शिंदे, सचिन कांदे आणि किशन गोविंदवाड यांच्यासह अनेक कामगार प्रतिनिधी सहभागी झाले होते.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button