पुणेमहाराष्ट्र

कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन लवकरच

पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा मार्ग मोकळा

कात्रज–कोंढवा रस्ता हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने गेली अनेक वर्षे सदर रस्ता प्रलंबित होता. पुणे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा प्रकल्प गतिमानतेने पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीशः लक्ष घालून प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना प्रशासनास दिल्या होत्या. या प्रकल्पासाठी भू-संपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून पहिल्या टप्प्यातील ५० मीटर रुंदीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठविलेला भूसंपादन प्रस्तावास आज उच्चस्तरीय समितीद्वारे मान्यता मिळाली आहे.
— नवल किशोर राम, महापालिका आयुक्त

निलेश राऊत
पुणे: पुणे शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्यासाठी, महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखालील भू-संपादन विभागाला यश आले आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पाठपुराव्यामुळे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वने यांचे अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक सोमवारी (दि. १३) सकाळी मंत्रालयात पार पडली. बैठकीमध्ये सदर अंतिम निवाडा प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, भूसंपादन निवाडा घोषित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या सुमारे १० वर्षापासून भूसंपादन साठी रखडलेला रस्ता प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. शासन मान्यता आदेश निर्गमित होताच सदर रस्त्यासाठी प्रत्यक्ष ताबे घेण्याचे आणि तातडीने रस्ता करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सदर रस्ता झाल्यानंतर शहरातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटून सुरक्षित जड वाहतुकीस देखील चालना मिळणार आहे.

कात्रज–कोंढवा रस्त्यापैकी एकूण ३.५ किमी लांबीच्या रस्त्यासाठी हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन केले जाणार आहे. ५० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामामध्ये मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सर्विस रस्ते, पावसाळी वाहिनी (U-ड्रेन), तसेच माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटरचा समावेश आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत उभारण्यात येणारा उड्डाणपूल राजस चौक येथे सुमारे २६० मीटरपर्यंत येत आहे. या उड्डाणपुलाच्या उतारासाठी विद्यमान वाहतूक वळविणे आवश्यक असल्याने सुमारे ४०० मीटर लांबीचे सर्विस रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी काही भाग पूर्ण झाला असून उर्वरित काम सुरू आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत सदर सेवा रस्ता काम झाल्यावर पुलाच्या एप्रोच रोडचे रखडलेले काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Land acquisition for widening of Katraj-Kondhwa road soon

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button