मावळ तालुक्यात शिक्षिकेचा अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना भरधाव डंपरची मोपेडला धडक
पिंपरी: मावळ तालुक्यात जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना दीपाली सुजित तांबे (वय-५०, रा. चिंचवड, मूळ रा. मंचर) असे अपघातात मृत्यू झालेल्या जनगणना प्रगणक शिक्षेकेचे नाव आहे. कान्हे फाटा येथे घडली आहे.
जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलावले जात असल्याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “या मृत्यूला जबाबदार कोण?” असा सवाल शिक्षकांकडून केला जात असून महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी होत आहे.

निगडित पाण्याची पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी गेले वाया
मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान जेसीबी मशीनने खोदकाम करताना घडला प्रसंग
पिंपरी: भक्ती-शक्ती उड्डाणपूलाखाली श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण मुंबई-पुणे महामार्ग परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान जेसीबी मशीनने खोदकाम करताना (दि.२७) रोजी रात्री पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून परिसरातील पाणीपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
या घटनेचा फटका निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर आदी भागातील नागरिकांना बसला. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे संबंधित मेट्रो रेल्वे ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान अनेक वेळा पाणी पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. नागरिकांनीही मेट्रो प्रकल्पाच्या कामांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.


