PUNE NEWS : नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण करा!

आपत्ती व्यवस्थापनासाठी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थित पुण्यात बैठक
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात उद्भवू शकणारी संभाव्य पूर परिस्थिती रोखण्यासाठी, नाला सफाईची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये शहरातील विविध भागांतील विकासकामे, पावसाळ्यातील नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करायच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.PUNE NEWS

या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, हडपसरचे आमदार चेतन तुपे, कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने आणि खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर, विशेष अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी होते.
बैठकीदरम्यान शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावी आणि गतिमान करण्याच्या विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात पुणे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच नाला सफाईची प्रलंबित कामे दर्जेदार पद्धतीने आणि दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.PUNE NEWS
बैठकीत उपस्थित सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतला आणि पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लावण्याची मागणी केली.
या बैठकीत घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात कचरा डेपो परिसरातील स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. शहरातील कचरा संकलनाची एकूण क्षमता वाढवणे, कचरा प्रक्रिया प्रकल्प अधिक सक्षम करणे आणि नव्या कचरा डेपोसाठी योग्य जागेचा शोध घेणे याविषयी विविध घटकांनी आपले मत मांडले. याशिवाय, शहरातील नागरिकांच्या वाढत्या गरजेचा विचार करून जुन्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करणे आणि शहरात आवश्यक त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.PUNE NEWS
विविध माहितींसाठी ॲप डाऊनलोड करावे
पुणे शहरातील सर्व अधिकृत माहिती, शासकीय सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांची नियमित माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी पीएमसी केअर हे महापालिकेचे अधिकृत मोबाईल ॲप आजच डाऊनलोड करावे, असे आवाहन देखील या वेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
PUNE NEWS


