Pune Crime : पुणे शहरात एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची दुहेरी कारवाई; चार आरोपी ताब्यात
Pune Crime : ११९ ग्रॅम एमडीसह मोबाईल, अॅक्टिव्हा आणि रोकड जप्त; ४.४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ११९ ग्रॅम ९७ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ, मोबाईल हँडसेट, अॅक्टिव्हा स्कूटर आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४ लाख ४७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime
बंडगार्डन परिसरात दोघे ताब्यात
पहिली कारवाई ५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आगरकरनगर परिसरात लोढा कन्स्ट्रक्शनच्या सीमाभिंतीलगत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गस्तीवर असताना पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना एमडी विक्रीसंदर्भात माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून फैसल रसूल शेख (वय २१, रा. येवलेवाडी) आणि आबुबखर मौला शेख (वय २४, रा. गोखलेनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २७ ग्रॅम १३ मिलीग्रॅम एमडी, दोन मोबाईल हँडसेट, एक अॅक्टिव्हा स्कूटर आणि ४५० रुपये रोख असा एकूण १ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.
फुरसुंगीत ९२ ग्रॅम एमडी जप्त
दुसरी कारवाई त्याच दिवशी रात्री सुमारे ९ वाजून ५० मिनिटांनी सासवड-हडपसर रस्त्यावरील नालंदानगरी अपार्टमेंटसमोर, हडपसरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर फुरसुंगी येथे करण्यात आली.
पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सूरज संजय खत्री (वय २५, रा. हडपसर) आणि आरबाज इकबालखान (वय २४, रा. हांडेवाडी रोड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९२ ग्रॅम ९४ मिलीग्रॅम एमडी आणि एक मोबाईल हँडसेट असा एकूण २ लाख ९८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २२ (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंदारे करीत आहेत.
दोन कारवायांत चार जण ताब्यात
अंमली पदार्थविरोधी पथक क्रमांक एकने केलेल्या या दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ११९ ग्रॅम ९७ मिलीग्रॅम एमडी, दोन मोबाईल हँडसेट, एक अॅक्टिव्हा स्कूटर आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

