Pune News : पुणे मनपात ‘सिद्धिविनायक’ची मानवी हक्कांची विटंबना
Pune News : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटदाराची मुजोरी; गरोदर महिलेचा छळ अन् कामगारांची पिळवणूकhttps://maharashtramirror.com/ Pune News
Pune News : महत्वाचे मुद्दे
*दरमहा प्रत्येक कामगाराच्या वेतनातून विनाकारण १,००० ते २,००० रुपयांची मनमानी कपात केली जाते
*किरकोळ कारणांवरून आणि खोट्या ‘मेमो’च्या नावाखाली कामगारांची आर्थिक लूटमार होते
*याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कामगारांना थेट कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते
*नियम धाब्यावर बसवून एकाच महिला कामगाराकडून तीन व्यक्तींचे काम करून घेतले जाते
*दिवसभर उन्हात राबणाऱ्या या कामगारांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही
*वॉशरूमला जाण्यासाठी सुपरवायझरची परवानगी घेण्याची सक्ती केली जातेhttps://maharashtramirror.com/ Pune News
धनश्री ओतारी
Pune News : पुणे महानगरपालिकेच्या (मनपा) घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत येणाऱ्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटी कामगारांच्या शोषणाचा अत्यंत भयानक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा केला जात असतानाच, प्रत्यक्षात कामगारांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले जात असल्याचे विदारक चित्र उघडकीस आले आहे. मे. सिद्धिविनायक ग्रुप ऑफ कंपनी’ या ठेकेदार संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कामांमध्ये कामगारांवर उघडउघड दडपशाही सुरू आहे. या कंत्राटदाराकडून एका गर्भवती महिला कर्मचाऱ्यावर अमानुष अत्याचार करत तिचे आर्थिक शोषण केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक
केवळ एकाच महिलेपुरते हे शोषण मर्यादित नसून, या कार्यालयातील इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली जात आहे. वेळेवर वेतन न देणे, ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे देणे आणि हक्काच्या रजा नाकारणे अशा प्रकारांमुळे कामगार त्रस्त झाले आहेत.
‘मेमो’च्या नावाखाली बेकायदेशीर वसुली
महिनाभर राबून, तब्बल २६ दिवस प्रामाणिकपणे कचरा उचलून आणि स्वच्छता राखणाऱ्या या महिला कामगारांच्या तोंडाचा घास घेण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. दरमहा प्रत्येक कामगाराच्या वेतनातून विनाकारण १,००० ते २,००० रुपयांची मनमानी कपात केली जात आहे. विशेष म्हणजे, किरकोळ कारणांवरून आणि खोट्या ‘मेमो’च्या नावाखाली कामगारांची आर्थिक लूटमार केली जात आहे. याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कामगारांना थेट कामावरून काढून टाकण्याची आणि घरी बसवण्याची धमकी सुपरवायझर व ठेकेदार देत आहेत.
गर्भवती महिलेला बाथरूमला जाण्यासाठी सुद्धा हिशेब द्यावा लागतो
एका गर्भवती महिला कामगारावरही ठेकेदार आणि त्याच्या हस्तकांनी अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. ठेकेदाराकडून सक्तीने काम करून घेतले जात आहे. यासंदर्भात एका पीडित महिला कामगाराने व्यथा मांडताना सांगितले की, “मला थंडी-ताप आणि अंगदुखी असतानाही मी कामावर गेले, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला कामावरून थेट तडकाफडकी घरी पाठवण्यात आले. मला बाथरूमला जाण्यासाठी सुद्धा हिशेब द्यावा लागतो आणि त्यावरून अपमानास्पद बोलणी ऐकावी लागतात.” तीन लहान मुले असणाऱ्या आणि पहाटेपासून संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांवर अशा प्रकारे होणारा हा मानसिक व शारीरिक छळ बघून इतर महिला कामगारांचे डोळे पाणावले. “असा नीचपणा कसा सुचतो? एका गर्भवती महिलेवर अत्याचार करताना यांच्या मनामध्ये थोडीही दया-माया कशी येत नाही?” असा संतप्त सवाल उपस्थित महिलांनी केला आहे.
एकाच कामगारावर तिप्पट बोजा
नियम धाब्यावर बसवून एकाच महिला कामगाराकडून तीन-तीन व्यक्तींचे काम करून घेतले जात आहे. घरोघरी फिरून कचरा गोळा करणाऱ्या या महिलांना ना सुरक्षिततेची साधने दिली जात आहेत, ना नियमानुसार आरोग्य किट पुरवले जात आहेत. दिवसभर उन्हात राबणाऱ्या या कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. लघवीसाठी किंवा प्रातर्विधीसाठी जाण्याकरिता देखील सुपरवायझरची परवानगी घेण्याची सक्ती केली जाते, जी मानवी हक्कांची उघडपणे विटंबना करणारी आहे.
सुपरवायझरची मुजोरी
ठेकेदाराचे सुपरवायझर कामगारांना स्वतःची खासगी घरगुती कामे करायला लावत असून, त्यासाठी मोबदला उकळण्याचे प्रकारही समोर आले आहेत. कामगार हे पोटासाठी आणि उदरनिर्वाहासाठी जगप्रपंच चालवायला आले आहेत, कोणतीही भीक मागण्यासाठी नाही. परंतु ठेकेदाराची ही नवी ‘गुंडगिरी’ आता सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.
“आम्ही आमच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. जर प्रशासनाने या ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई केली नाही, तर हा लढा आणखी तीव्र केला जाईल,” असा इशारा संतप्त कामगारांनी दिला आहे. अर्ध्या रात्री सुद्धा न्याय मिळवण्यासाठी आम्ही एकत्र उभे राहू, अशी ठाम भूमिका घेत महिला कामगारांनी महापालिका प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. आता पालिका आयुक्त आणि घनकचरा विभाग या भ्रष्ट व असंवेदनशील ठेकेदारावर काय कायदेशीर कारवाई करणार, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागून राहिली आहे.

