Pune News : ट्रक टर्मिनसच्या आरक्षित जागेवर पद्मावती मेट्रो स्थानक
Pune News : महापालिकेकडून ६६५ चौरस मीटर जागा हस्तांतरित
Pune News :पुणे: स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गावरील पद्मावती स्थानकाच्या उभारणीसाठी पुणे महानगरपालिकेची धनकवडी येथील ६६५ चौरस मीटर जागा महामेट्रोला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेच्या मूल्यांकनाच्या दुप्पट म्हणजेच दोन कोटी ३१ लाख ५५ हजार रुपये महापालिकेच्या आर्थिक दायित्वात समायोजित केले जाणार आहेत. शहर सुधारणा समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असून, अंतिम मंजुरीसाठी तो मुख्य सभेकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.https://maharashtramirror.com/ Pune News
धनकवडी येथील सर्व्हे क्रमांक १९ अ/४ अ आणि ब मधील ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जागेवर पद्मावती मेट्रो स्थानक होणार आहे. यासाठी महामेट्रोने महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. प्रशासनाने या जागेचे मूल्यांकन एक कोटी १५ लाख ७७ हजार ६०० रुपये निश्चित केले असून, त्याच्या दुप्पट रक्कम महामेट्रोकडून महापालिकेच्या आर्थिक दायित्वात समायोजित केली जाईल..https://maharashtramirror.com/ Pune News
बाधित भाडेपट्टाधारकांचे पुनर्वसन
या योजनेअंतर्गत भूखंड क्रमांक ८, ९ आणि १० महामेट्रोला हस्तांतरित केले जाणार आहेत. यातील भूखंड क्रमांक ८ चे मूळ भाडेपट्टाधारक सय्यद शेरअली सय्यद मेहबूब आणि भूखंड क्रमांक १० चे मूळ भाडेपट्टाधारक दिवंगत सतीश शिवाजीराव पाटील यांच्या वारसांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी कोंढवा बुद्रुक येथे अनुक्रमे २२५ आणि २२० चौरस मीटर जागा देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
अटींचा भंग केल्याने भूखंड क्र. ९ चा ताबा परत घेणार
दुसरीकडे, भूखंड क्रमांक ९ चे भाडेपट्टाधारक रवींद्र छोटूसिंग निवते यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय जागेचे हस्तांतरण केले तसेच जागेच्या वापरात बदल केल्याचे निष्पन्न झाले आहे. भाडेपट्टा करारातील अटींचा भंग झाल्यामुळे संपूर्ण प्रीमियम रक्कम जमा करून करार रद्द करणे आणि भूखंडाचा ताबा महापालिकेने परत घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मुख्य सभेच्या मंजुरीनंतर हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होईल.


