वारजे माळवाडीत ‘टेलिग्राम टास्क’च्या नावाखाली ३३ लाखांची फसवणूक

पार्ट टाइम जॉबचे आमिष पडले महाग
पुणे: ‘पार्ट टाइम जॉब’ आणि ‘टेलिग्राम टास्क’ पूर्ण केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून वारजे माळवाडी परिसरातील एका ४३ वर्षीय व्यक्तीची ३३ लाख ७२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्यांनी विविध बँक खात्यांद्वारे ही रक्कम उकळली असून, याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात राहणाऱ्या एका ४३ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही फसवणूक ६ जुलै २०२५ ते १६ जुलै २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून करण्यात आली. अज्ञात मोबाईल धारकांनी फिर्यादीशी टेलिग्राम आयडीवरून संपर्क साधला. त्यांना घरबसल्या पार्ट टाइम जॉब करून पैसे कमवण्याची संधी असल्याचे सांगून विविध टास्क पूर्ण करण्यास प्रवृत्त केले.
सुरवातीला चोरट्यांनी फिर्यादीला काही लिंक पाठवल्या आणि छोटे टास्क पूर्ण केल्यावर अल्प परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, “जास्त पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळेल,” असे सांगून त्यांना टेलिग्राम टास्कमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादीने नफ्याच्या आशेने विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण ३३ लाख ७२ हजार रुपये जमा केले. मात्र, ही रक्कम आणि त्यावर मिळणारा परतावा देण्यास चोरट्यांनी नकार देत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
वारजे माळवाडी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(डी) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अनोळखी टेलिग्राम चॅनेल किंवा पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली येणाऱ्या लिंकवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
Fraud of Rs 33 lakhs in the name of 'Telegram task' in Warje Malwadi


