Pune News : पुण्यात पालखी मुक्कामासाठी दर्शन रांगा आणि वाहतूक मार्गांचे नियोजन जाहीर

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी, Pune News : आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि.९) पुणे शहरात होणाऱ्या दोन्ही पालख्यांच्या मुक्कामादरम्यान भाविक व वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी पुणे महापालिकेसह पुणे पोलीस प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था आणि वाहतुकीचे विशेष नियोजन जाहीर करण्यात आले आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी भाविकांना दर्शनासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.Pune News

यंदा दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगांचे आयोजन करण्यात आले असून, गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तासह तात्काळ मदतीसाठी पाच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे देखील उभारण्यात आली आहेत.
या नियोजनानुसार, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन व्यवस्थेसाठी महिला आणि पुरुषांकरिता स्वतंत्र दर्शन रांगा ठेवण्यात आल्या असून, या रांगा डावरे चौक येथून सुरू होतील. दर्शन पूर्ण झाल्यानंतर भाविकांना शिवप्रताप चौकाकडून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. केवळ मुख दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांना चौकातूनच दर्शन घेऊन भक्ती शिल्प कमानीकडून बाहेर पडता येईल, तर भक्ती शिल्प कमान आणि हमाल तालीम येथून मुख्य दर्शनासाठीचा प्रवेश पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.Pune News
दुसरीकडे, नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात विसावलेल्या संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी पुरुषांची रांग लखेरी मारुती मंदिराकडून तर महिलांची रांग अरुणा चौक येथून सुरू होईल. मुख दर्शन घेणाऱ्या भाविकांनी अरुणा चौकातून दर्शन घेऊन लखेरी मारुती मंदिराच्या दिशेने बाहेर पडावे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि दळणवळणाचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे.Pune News
निवडुंगा विठोबा ते ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या प्रवासासाठी अरुणा चौक, इनामदार चौक आणि डावरे चौक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे, तर पालखी विठोबा ते निवडुंगा विठोबा मंदिरासाठी भक्ती शिल्प कमान, शिवप्रताप चौक, अशोका चौक, इनामदार चौक आणि अरुणा चौक या मार्गाचा वापर करावा.
सुरक्षेचा आणि आपत्कालीन मदतीचा भाग म्हणून नानापेठ पोलीस चौकी, पालखी विठोबा मंदिर, रामोशी गेट चौक, निवडुंगा विठोबा मंदिर आणि संत कबीर चौकी अशा पाच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.Pune News
महापौर मंजुषा नागपुरे यांनी संपूर्ण पालखी परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ (नो हॉकर्स झोन) घोषित केल्याचे सांगत सर्व भाविकांना गर्दीच्या ठिकाणी धक्काबुक्की किंवा गोंधळ न करता संयम व शिस्त बाळगण्याचे आणि पोलीस व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Pune News


