Nagpur News: एमपीएससीच्या दोन सदस्यांची एसआयटीकडून चौकशी?
Nagpur News: परीक्षेतील गोंधळाचा संशय ; औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणानंतर तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता
Nagpur News:नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-ब आणि गट-क पूर्व व मुख्य परीक्षा २०२५ मधील कथित गैरप्रकारांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आयोगातील घडामोडींना वेग आला आहे. आयोगाचे अध्यक्ष रजेवर गेले असून सचिवांचीही बदली करण्यात आली आहे. आता आयोगातील दोन सदस्य एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.https://maharashtramirror.com/ Nagpur News
आयोगातील वरिष्ठ सदस्य उपलब्ध असतानाही अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपवण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर दोन सदस्यांकडे एसआयटीचे लक्ष असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, संबंधित सदस्यांना संशयित किंवा आरोपी ठरवण्यात आलेले नसून त्यांच्या चौकशीबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब परीक्षेच्या कथित प्रश्नपत्रिका फुटीमुळे आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जानेवारी २०२६ मध्ये हे प्रकरण समोर आले. त्या कालावधीत आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार होता. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ज्ञांची निवड, त्यांच्याकडून प्रश्नसंच मागवणे, अंतिम प्रश्नांची निवड आणि प्रश्नपत्रिका छपाईसाठी पाठवणे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय असते. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्या स्तरावर त्रुटी किंवा गैरप्रकार झाला, याचा शोध एसआयटीकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
आणखी एका सदस्याकडेही लक्ष
आयोगातील डॉ. अभय वाघ यांच्यासह पोलीस विभागातून आलेल्या आणखी एका सदस्याचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, या सदस्याचे नाव तसेच त्यांच्यावरील नेमका संशय अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेला नाही. औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तपास पोहोचला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणात आयोगाच्या अवर सचिवांसह सहा जणांना अटक केल्याची माहिती आहे. त्यामुळे एसआयटीच्या तपासातून आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.
आजी-माजी अध्यक्ष, सदस्यांच्या चौकशीची मागणी
औषध निरीक्षक भरती प्रकरणातील आरोपी ज्या कालावधीत कार्यरत होते, त्या काळात झालेल्या अन्य परीक्षांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. आंदोलनादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आयोगाच्या आजी-माजी सदस्य आणि अध्यक्षांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एसआयटीचा तपास केवळ औषध निरीक्षक परीक्षेपुरता मर्यादित राहणार की अन्य परीक्षांपर्यंतही त्याची व्याप्ती वाढणार, याकडे आता राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.



