क्राईम न्यूजपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

प्रार्थनेद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पास्टरविरुद्ध पिंपरी चिंचवडमध्ये तक्रार

चर्चमध्ये येऊन आरडाओरड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल फिर्यादी व अन्य लोकांविरुद्धही तक्रार

पिंपरी : पिंपरी चिंचवड काळेवाडी येथील एका चर्चमध्ये विनापरवाना लोकांना जमवून, प्रार्थनेद्वारे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या पास्टरवर काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फिर्यादीला मारहाण केल्याप्रकरणी पास्टरसह इतर ७ ते ८ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्‍ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील परमवीर कॉलनी येथील ‘जीजस इस लॉर्ड चर्च’मध्ये रविवारी (ता. २६ ) सकाळी ११:३० ते दुपारी २:३० च्या दरम्यान ही घटना घडली. पास्टर केनेथ सिल्वे हा कोणत्याही परवानगीशिवाय लोकांना बेकायदेशीररित्या जमा करून त्यांची प्रार्थना घेत होता. यावेळी तो प्रार्थनेद्वारे लोकांचे गंभीर आजार बरे करतो, असा दावा करून समाजात अंधश्रद्धा पसरवत असल्याचे समोर आले.

यावेळी फिर्यादी सिद्धांत शाहूराज चव्हाण (वय ३५, रा. भोसरी) यांनी आपल्या आपल्या मोबाईलमध्ये हे चित्रीकरण करत असताना ते पाहून चिडलेल्या पास्टर केनेथ सिल्वे याने तिथल्या ७ ते ८ अनुयायांना फिर्यादीला मारहाण करण्यासाठी चिथावणी दिली. आरोपींनी चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, त्यांना वाचवण्यासाठी आलेले प्रतीक विलास खराडे आणि वैभव संतोष सावंत यांनाही आरोपींनी मारहाण केली.

या प्रकरणी सिद्धांत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळेवाडी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

तर दुसरीकडे , धार्मिक प्रार्थना सुरू असताना चर्चमध्ये येऊन आरडाओरड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल निकसन थॉमस यांनीही फिर्यादी सिद्धांत शाहूराज चव्हाण यांच्यासह अन्य तिघांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्याविरोधात काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Complaint filed in Pimpri Chinchwad against pastor who claims to cure diseases through prayer




Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button