देश-विदेश

Corona News : कोरोनाची नवी लाट डोके वर काढतेय! भारत आणि जगभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय

थायलंडमध्ये आठवडाभरात 50 हजार रुग्ण; भारतातही चिंता वाढवणारे आकडे, जेएन.1 व्हेरिएंटचा फैलाव – महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि दिल्ली धोक्याच्या झोनमध्ये

ANI :– जगभरात थोडीशी शांत झालेली कोरोनाची सावली पुन्हा एकदा गंभीर रूप धारण करत आहे. भारतासह अनेक देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. थायलंडमध्ये अवघ्या एका आठवड्यात तब्बल 50,000 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, ज्याने जागतिक आरोग्य यंत्रणांचे टेंशन वाढवले आहे.

भारतही या संकटापासून दूर नाही.
गुजरातमध्ये एकाच दिवसात 50 नवीन रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण देशभरात कोविड-19 च्या जेएन.1 व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, दिल्ली आणि कर्नाटक ही राज्यं सध्या रुग्णवाढीच्या केंद्रस्थानी आहेत. दिल्लीमध्ये सध्या 23 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून गाझियाबादमध्ये 4 नवीन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये 9 महिन्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेएन.1व्हेरिएंटचे लक्षणं म्हणजे थंडी वाजणे, सतत खोकला, ताप आणि डोकेदुखी. आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.

थायलंडमधील वाढती चिंता:
थायलंडमध्ये 11 ते 17 मे दरम्यान 49,065 रुग्णांची नोंद झाली असून त्यानंतर फक्त चार दिवसांत आणखी 12,545 नव्या केसेस समोर आल्या आहेत.ओमिक्रॉनचा XEC उपप्रकार ही रुग्णवाढीमागील मुख्य कारण मानलं जातंय. हा प्रकार मौसमी फ्लूपेक्षा सात पट अधिक वेगाने पसरतो.

तरीसुद्धा, मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि अ‍ॅण्टीव्हायरल उपचारांमुळे मृत्युदर अत्यल्प म्हणजे 0.02% वर स्थिर आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, वयोवृद्ध, गरोदर महिला, लहान मुले आणि ज्या लोकांना श्वसनाचे विकार आहेत – त्यांची विशेष काळजी घ्यावी.

तज्ज्ञांचा अंदाज आहे की सध्याची लाट 2-3 महिने टिकू शकते. पण जर नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली तर या लाटेवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. थायलंड सरकारने मे ते ऑगस्ट दरम्यान कमकुवत गटांसाठी मोफत लसीकरण मोहिम राबवण्याची घोषणा केली आहे. मात्र, बूस्टर डोससाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button