पुणेमहाराष्ट्र

MPSC Paper Leak: ‘मी येण्यापूर्वीच पेपर फुटला, मग माझ्या राजीनाम्याची मागणी का?’

MPSC Paper Leak प्रकरणी अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे स्पष्टीकरण

पुणे, महाराष्ट्र मिरर

MPSC Paper Leak महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून होत असलेल्या वैयक्तिक आरोपांवर आणि राजीनाम्याच्या मागण्यांवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी बुधवारी (२ सप्टेंबर २०२६) एका खुल्या पत्रकाद्वारे आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करत मी येण्यापूर्वीच पेपर फुटला, मग माझ्या राजीनाम्याची मागणी का? असा उलट सवाल त्यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. त्यामुळे या पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण लागले आहे. प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी २०२६ मधील असून आपण मार्च २०२६ मध्ये पदभार स्वीकारला आहे, असा महत्त्वपूर्ण खुलासा त्यांनी याद्वारे केला आहे. MPSC Paper Leak on Chairman Statement

PMC : हडपसरमध्ये कचऱ्याच्या डंपरने घेतला तरुणाचा जीव

औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात आपल्याविरोधात काही वैयक्तिक आरोप केले जात असून राजीनाम्याची मागणी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी हे पत्र प्रसिद्ध करण्यात आल्याचे भीमनवार यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित घटनाक्रम स्पष्ट करताना त्यांनी नमूद केले की, औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी २०२६ मध्ये घडली होती. याच्या विपरीत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ त्यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली आणि ३ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे घडलेल्या घटनेशी आपल्या कार्यकाळाचा कोणताही संबंध नसताना आपल्यावर टीका केली जात असल्याचे यातून स्पष्ट होते. MPSC Paper Leak

Pune News : अण्णा हजारेंची प्रकृती स्थिर; ताप-खोकल्यामुळे रुग्णालयात दाखल

घटना घडल्यानंतर आयोगाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाई होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांची व घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी आयोगाने अंतर्गत पातळीवर एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविले जात आहेत. तसेच, एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक असलेल्या समग्र सुधारणा सुचवण्यासाठी शासनाकडूनही एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून आपले संपूर्ण लक्ष आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता बळकट करण्यावर केंद्रित असल्याचे भीमनवार यांनी स्पष्ट केले. आयोगावर सोपवण्यात आलेल्या वाढीव भरतीच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर, लाखो उमेदवारांना न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पूर्ण निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. MPSC Paper Leak

राजकीय वाद टाळण्याचे आवाहन
लोकशाही व्यवस्थेत सार्वजनिक परीक्षांबाबत लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा तसेच चिंता व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, ज्याचे आपण स्वागतच करतो, असे भीमनवार यांनी म्हटले आहे. मात्र, कोणत्याही गंभीर आरोपाचे मूल्यांकन केवळ वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक भरतीसारख्या अत्यंत संवेदनशील विषयामध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भविष्य गुंतलेले असते, त्यामुळे अशा विषयांचे वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये, अशी नम्र विनंती त्यांनी सर्व संबंधितांना केली आहे. MPSC Paper Leak

दरम्यान, त्यांच्या या पत्रकानंतर आमदार रोहित पवार यांनी जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नसल्याचे म्हणत भीमनवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.

आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटला असेल तर परीक्षेच्या दोन महिने आधीच पेपर फुटला ही बाब अत्यंत गंभीर नाही का ? परीक्षेच्या दोन महिने आधी पेपर फुटला असतानादेखील मार्च मध्ये पेपर घेतलाच का? दोन महिने आयोग झोपा काढत होता का ?

कर्णिक घोटाळ्यासारखेच हे प्रकरण असून आपण जो विश्वासघात केलाय ना त्यामुळे अभ्यास करावा की करू नये ? या द्विधा मनस्थितीत आज विद्यार्थी आले आहेत, लायब्ररीतसुद्धा बसण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. संवैधानिक पदाची, आयोगावरच्या विश्वासाची, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आपल्याला खरंच काळजी असेल तर तत्काळ नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्या आणि लाखों विद्यार्थ्यांवर उपकार करा.

राहिला विषय वैयक्तिक आणि राजकीय आरोपांचा, त्यासंदर्भात मी अजून एक टक्का देखील बोललेलो नाही, जेव्हा बोलायला सुरुवात करेल ना तेव्हा आपणच काय तर आपला पाठीराखा असलेल्या सरकारला सुद्धा परवडणार नाही कारण मी पुराव्याशीवाय बोलत नाही.

जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.

आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६… https://t.co/GQqoCoG36b— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 2, 2026

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button