अकरावी प्रवेश: नऊ लाख विद्यार्थ्यांनी नोंदविले पसंतीक्रम

अर्ज, पसंतीक्रम भरण्याची मुदत संपली
निलेश राऊत
पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीअंतर्गत एकूण १२ लाख ४९ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची मुदतही संपली आहे. त्यात ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून अर्ज लॉक केले आहे.

राज्यातील ९ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांत २१ लाख ९८ हजार ६६६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीअंतर्गत ६ लाख १७ हजार २९५ मुले, तर ६ लाख १५ हजार ५९८ मुलींनी नोंदणी केली आहे. १० लाख ८ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग १ भरून लॉकही केला आहे. कॅपअंतर्गत अर्जाचा भाग २ च्या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदवून ८ लाख ८३ हजार १०१ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले. इनहाउन कोट्यांअंतर्गत ४२ हजार ६३५, व्यवस्थापन कोट्याअंतर्गत २६ हजार ७२६, अल्पसंख्याक कोट्यासाठी ४२ हजार १२६ याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविले आहेत.
दरम्यान, संकेतस्थळ बंद पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.
निवड यादी २९ मे रोजी जाहीर होणार
प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे, पसंतिक्रम नोंदवण्यास २६ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, ती संपली असून, पहिल्या फेरीची निवड यादी २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २९ मे ते ३ जून या कालावधीत महाविद्यालयात जाऊन, कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. दुसरी फेरीचे वेळापत्रक ५ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. ६ जूनला पहिल्या फेरीतील प्रवेशाच्या रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत.


