पुणे

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणुक ८ जूनला

माजी अध्यक्ष विजय पाटकर आणि विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यात थेट लढत

निलेश राऊत
पुणे:
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची घोषणा होताच मराठी चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर आणि विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यात थेट आणि प्रतिष्ठेची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही गटांकडून संघटनात्मक बांधणी, बैठका आणि सदस्य संपर्क मोहिमा सुरू झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी त्यांच्या कार्यकाळात कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना जुन्या सदस्यांचा मोठा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी गेल्या काही महिन्यांत संघटनात्मक पातळीवर सक्रियता वाढवत नव्या कलाकारांना संधी, डिजिटल माध्यमांमध्ये मराठी चित्रपटांचे प्रतिनिधित्व आणि पारदर्शक प्रशासन यावर भर दिला आहे.

बाबा पाटील यांच्या भूमिकेबाबत सर्वाधिक चर्चा
मात्र या संपूर्ण निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होत आहे ती बाबा पाटील यांच्या भूमिकेबाबत. सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रात प्रभावी संघटन कौशल्य असलेल्या बाबा पाटील यांनी अद्याप कोणत्याही गटाला अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ते स्वतंत्र भूमिका घेणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

याच पार्श्वभूमीवर महामंडळाचे माजी संचालक सुशांत शेलार आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची नावे चर्चेत आली आहेत. सुशांत शेलार हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. चित्रपट, सांस्कृतिक आणि युवक संघटनांमध्ये त्यांचा मोठा संपर्क असल्याचे मानले जाते. संघटनात्मक नियोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन यामध्ये त्यांचा प्रभावी सहभाग राहिला आहे.

दुसरीकडे अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या पूर्वी भारतीय जनता पार्टी च्या सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. कलाकारांशी असलेला जवळचा संपर्क आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय सहभागामुळे त्यांचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे बोलले जाते.

पाटील हे महायुतीच्या राजकीय तत्त्वानुसार सांस्कृतिक क्षेत्रात
सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा पाटील हे महायुतीच्या राजकीय तत्त्वानुसार सांस्कृतिक क्षेत्रातही एक नवे समीकरण तयार करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सुशांत शेलार आणि प्रिया बेर्डे या दोघांना एकत्र घेऊन स्वतंत्र पॅनल किंवा समन्वयक भूमिका उभी करण्याबाबत काही बैठका झाल्याची माहिती समोर येत आहे. जर हे समीकरण प्रत्यक्षात आले, तर निवडणुकीचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

महामंडळामध्ये यावेळी कलाकार कल्याण निधी, ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक सहाय्य, लोककलांना व्यासपीठ, ग्रामीण कलाकारांना प्रतिनिधित्व आणि डिजिटल युगातील मराठी चित्रपटांचे प्रश्न हे प्रमुख मुद्दे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ व्यक्तींची लढत न राहता विचारसरणी आणि संघटनात्मक ताकदीची चाचणी म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, बाबा पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी “लवकरच मोठा निर्णय जाहीर होईल” असे संकेत देण्यात येत आहेत. त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीचा कार्यक्रम असा राहील: उमेदवारी अर्ज देणे-स्वीकारणे: १९ ते २२ मे; अर्ज छाननी, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे: २५ मे; अर्ज माघारी: २६ मे ते २८ मे; चिन्ह वाटप: २९ मे; मतदान: ७ जून; मतमोजणी व निकाल: ८ जून

पुणे न्युज

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button