Pune News : यंदा नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! सात दिवस चालणार दीपोत्सव; जाणून घ्या दिवाळीचे संपूर्ण वेळापत्रक आणि पूजेचे मुहूर्त
Pune News :पुणे : यंदाच्या दिवाळीत तिथींच्या गणितामुळे सणांच्या तारखांमध्ये विशेष बदल पाहायला मिळणार आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही महत्त्वाचे सण एकाच दिवशी, म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवाचे नियोजनही काहीसे वेगळे असणार आहे. ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारा दिवाळीचा उत्सव ११ नोव्हेंबरपर्यंत सात दिवस रंगणार आहे. दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी यंदाच्या दिवाळीतील सण, धार्मिक परंपरा आणि पूजेच्या मुहूर्तांची माहिती दिली आहे.https://maharashtramirror.com/Pune News

दिवाळीचे सण आणि तारखा
५ नोव्हेंबर (गुरुवार) – रमा एकादशी आणि वसुबारस : दिवाळीची सुरुवात रमा एकादशी आणि वसुबारसने होईल. या दिवशी सवत्स धेनू अर्थात गाय आणि वासराचे पूजन केले जाते.
६ नोव्हेंबर (शुक्रवार) – धनत्रयोदशी : धन्वंतरी पूजनासह लक्ष्मी-कुबेराची आराधना आणि यमदीपदान करण्याची परंपरा आहे.
८ नोव्हेंबर (रविवार) – नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन : पहाटे अभ्यंगस्नान करून नरक चतुर्दशी साजरी केली जाईल. सायंकाळी लक्ष्मी-कुबेराचे पूजन केले जाईल. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी ५.५० ते रात्री १०.५० असा आहे.
१० नोव्हेंबर (मंगळवार) – बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) : बळीराजाचे पूजन, वहीपूजन आणि पती-पत्नीमधील स्नेहाचे प्रतीक असलेला पाडवा साजरा होईल.
११ नोव्हेंबर (बुधवार) – भाऊबीज : बहिणी भावाचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतील.
आनंद, उत्साह आणि नात्यांचा दीपोत्सव
दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, फराळ, नवीन कपडे आणि भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीतून दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे. स्वच्छता, समृद्धी आणि आपुलकीचा संदेश देणारा हा सण कुटुंबातील नाती अधिक घट्ट करणारा ठरतो. यंदा तिथींच्या बदलामुळे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकत्र आल्याने या दोन्ही परंपरांचा उत्साह एकाच दिवशी अनुभवायला मिळणार आहे.



